एन. रघुरामन यांचा कॉलम:सणांच्या काळात शाळा आणि पालक मुलांचे प्रादेशिक ज्ञान वाढवू शकतात

मला आजही तो प्रसंग अगदी व्यवस्थित आठवतो. त्या काकू प्रार्थना करत होत्या आणि मोठ्याने म्हणाल्या, “दुर्गा माते, कृपा करून माझ्या कुटुंबाचे रक्षण कर.’ मी लगेच त्यांचा पदर ओढला आणि म्हणालो, “काकू, या अवतारात यांना आई काली म्हणतात.’ माझ्या शेजारी उभ्या असलेल्या आईने मला शांत बसवण्यासाठी डोक्यावर चापट मारली. त्या काकू काही सेकंद माझ्याकडे बघून हसल्या आणि पुन्हा प्रार्थना करू लागल्या. पण या वेळी त्या “कालीमाता’ म्हणाल्या. आपल्यापैकी बहुतेकांना देवीचे ते प्रसिद्ध रूप आठवत असेल. यात देवीने मुंडमाळ परिधान केली आहे आणि लालबुंद जीभ बाहेर काढली आहे. त्या मंडपात देवी याच अवतारात होती. बाहेर आल्यावर आईने विचारले, “काली कशामुळे?’ मी म्हणालो, “घोष शिक्षकांनी सांगितले होते की बंगालमध्ये या अवताराला कालीमाता म्हणतात. दीपावलीच्या रात्री त्यांचीही पूजा केली जाते. शाक्त परंपरेत महाकालीला बलाढ्य राक्षस रक्तबीजाचा संहार करणारी देवी म्हणून दाखवले आहे. उत्तर प्रदेशातील विंध्याचल येथे ‘त्रिकोण परिक्रमे’’’’चा एक भाग म्हणूनही माता कालीची पूजा केली जाते. त्या अनोळखी महिलेने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि माझे कौतुक केले. पहिल्यांदाच मी आईला आश्चर्याने माझे बोलणे ऐकताना पाहिले. याचे श्रेय नागपूरच्या आमच्या ‘सरस्वती विद्यालय’ या शाळेला जाते. तिथे सणांच्या सुट्ट्यांपूर्वी ‘जनरल नॉलेज’चे वर्ग घ्यायचे. दसराही त्याला अपवाद नव्हता. हे वर्ग विशेष असायचे. कारण विविध प्रदेशांत देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते आणि प्रत्येक रूपाशी तिथली एक स्थानिक कथा जोडलेली असते. वेगवेगळ्या राज्यांतून आलेले आमचे शिक्षक आपापल्या भागातील लोककथा गोळा करायचे आणि त्या जीकेच्या विशेष वर्गात सांगायचे. ते आलटून-पालटून या गोष्टी सांगायचे. काही वेळा गोष्टींमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी चित्रांचाही वापर करायचे. काही कथांमध्ये देवीने गावाचे रक्षण कसे केले हे सांगितले जायचे, तर काही कथांमध्ये देवीने पाऊस पाडल्याच्या, आजारपण नवसाने बरे केल्याच्या किंवा कौटुंबिक अडचणी दूर केल्याच्या गोष्टी असायच्या. यातील सर्वात रंजक कथा ‘ग्रामदेवी’च्या असायच्या. या ग्रामदेवी स्थानिक समाजाचे रक्षण करतात, अशी मान्यता होती. तामिळनाडूतील मंदिरांचे शहर असलेल्या कुंभकोणममधील आमच्या गावात त्यांना ‘मारी-अम्मन’ म्हणून पुजले जाते. इथे अम्मन म्हणजे आई आणि मारी म्हणजे पाऊस. आजसुद्धा मी कुंभकोणमला जातो, तेव्हा मारी-अम्मन मंदिरात जायला कधीही विसरत नाही. कारण ही देवी आमच्या गावाचे रक्षण करते अशी धारणा आहे. तिच्याकडे प्रार्थना केल्याने फक्त मुलेच आजारांपासून दूर राहत नाहीत तर जुन्या काळात देवीच्या कृपेने धोकादायक आजारही बरे व्हायचे. यानंतर शिक्षकांनी आम्हाला महाराष्ट्रातील देवीबद्दल माहिती दिली. स्कंदपुराणानुसार धाराशिव येथील तुळजाभवानीला ‘त्वरिता भवानी’ म्हणून ओळखले जायचे. भक्तांच्या आग्रहाखातर देवीने महिषासुराचा वध केला, असा उल्लेख त्यात आढळतो. पुढे ‘त्वरिता’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘तुळजा’ शब्द तयार झाला. इतिहासानुसार त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुलदेवी होत्या. ‘दुर्गा’ आणि ‘गरबा’ यांसारख्या अनेक शब्दांमागेही रंजक कथा आहेत. दुर्गा म्हणजे अजेय किंवा दुर्गम. ‘अजेय’ म्हणजे पराभूत करता येत नाही किंवा जिंकता येत नाही. ‘दुर्गम’ म्हणजे अशी जागा, जिथे पोहोचणे कठीण असते. याच कारणामुळे गुजरातमधील गिरनारच्या उंच शिखरांवर असलेल्या मातेच्या मंदिरांपर्यंत पोहोचणे सोपे नाही. तिथे अधिष्ठात्री देवी म्हणून अंबेच्या रूपात पूजा केली जाते. त्यांच्या या स्थानाला ‘दुर्गम’ म्हटले जाते. म्हणजेच येथे पोहोचणे कठीण आहे. छिद्र असलेल्या मातीच्या मडक्यात जळणारा दिवा ठेवून त्याच्या भोवती केला जाणारा गरबा नृत्यप्रकार ‘गर्भ’ या शब्दापासून बनला आहे. हे अंबेच्या गर्भाचे अमूर्त रूप मानले जाते. हिमाचल प्रदेशात देवीची पूजा अत्यंत लोकप्रिय आहे. तिथे ग्रामदेवीला संपूर्ण समाजाचा प्रमुख मानले जाते. हिमाचल प्रदेशात अनेक शक्तिपीठेही आहेत. फंडा असा आहे की, मुलांसोबत दसऱ्याच्या मंडपात जाताना पालकांनी त्यांना अशा गोष्टी सांगाव्यात. किंवा शाळेत सामान्य ज्ञानाच्या वर्गांतून त्यांना आपल्या प्रादेशिक चालीरीतींची माहिती द्यावी. यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *