एन. रघुरामन यांचा कॉलम:सणासुदीच्या काळात खरेदी करताना कपड्यांचे लेबलही समजून घ्या

नुकतेच माझ्या एका नातेवाइकाने परदेश दौऱ्यासाठी ऑनलाइन एक उबदार लोकरीचा स्वेटर विकत घेतला. त्याच्या लेबलवर लिहिले होते- ‘मेड विथ फाइन मेरिनो वूल.’ त्यांना वाटले की ते लोकरीचा उबदार स्वेटर खरेदी करत आहेत. पण दुर्दैवाने त्यांना हे माहीत नव्हते की, त्या स्वेटरमध्ये प्रत्यक्षात फक्त 5% लोकर होती, आणि त्यात 95% स्वस्त अ‍ॅक्रिलिक मिक्स होते. या घटनेने मला युरोपियन कमिशनने 18 जून 2026 रोजी केलेल्या सार्वजनिक घोषणेची लगेच आठवण करून दिली. त्यात असे सांगण्यात आले होते की, कमिशनने तपासलेल्या 37% (132 पैकी 49) कपड्यांवर फायबर कॉम्पोझिशनचे लेबल चुकीचे लावले होते. जगभरातील बदलत्या हवामानाचा विचार करता, हे समजून घेणे गरजेचे आहे. आयोगाने युरोपियन युनियनमधील अनेक सदस्य देशांमधील (सायप्रस, डेन्मार्क, फिनलंड, जर्मनी, इटली, लिथुआनिया, माल्टा आणि पोर्तुगाल) दुकाने आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून कपडे गोळा केले होते. यामध्ये 44 टॉप्स, लहान मुलांचे कपडे, अ‍ॅक्टिव्हवेअर, नाइट वेअर आणि स्कार्फचाही समावेश होता. तपासणीत असे आढळून आले की, नॅचरल आणि सिंथेटिक फायबरच्या मिश्रणातून बनवलेल्या कपड्यांमध्ये फेल्युअर रेट सर्वाधिक 64% होता. ज्या कपड्यांवर 100% कोणत्याही एकाच नॅचरल फायबरपासून (जसे की सुती किंवा लोकर) बनलेले असल्याचा टॅग होता, त्यात हे प्रमाण कमी होते, तरीही ते 15% इतके होते. विशेष म्हणजे, ऑनलाइन खरेदी केलेल्या कपड्यांमध्ये नियमांच्या उल्लंघनाचे प्रमाण 46% होते, तर प्रत्यक्ष दुकानातून खरेदी केलेल्या कपड्यांमध्ये हे प्रमाण 36% होते. याचा अर्थ असा नाही की, लेबलवर सांगितलेल्या फायबर्सची नावे चुकीची होती. ती नावे बरोबर होती. मात्र त्या फायबर्सची दिलेली टक्केवारी प्रयोगशाळेतील तपासणीत आढळलेल्या प्रमाणाशी जुळत नव्हती. उदा: एखाद्या कपड्यावर पॉलिस्टर आणि कॉटनचे समान प्रमाण असल्याचे सांगितले गेले. प्रत्यक्षात त्यात खूप मोठा फरक होता. येथे अशाच काही लेबल्सची माहिती दिली आहे, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी: ‘विस्कॉस फ्रॉम ऑर्गनिक बांबू’: हे ऐकायला अतिशय शुद्ध, नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक वाटते. पण प्रत्यक्षात बांबूला मोठ्या रासायनिक प्रक्रियेतून जावे लागते व त्याचे रूपांतर रेयॉनमध्ये केले जाते. या प्रक्रियेनंतर मूळ सेंद्रिय वनस्पतीचा कोणताही अंश त्यात शिल्लक राहत नाही. ‘कॉटन-रिच ब्लेंड’: या शब्दावरून असे वाटते की कपडा उच्च दर्जाच्या कॉटनपासून बनलेला आहे. पण प्रत्यक्षात अशा कपड्यांमध्ये 50% पेक्षा थोडा जास्त कॉटन असतो आणि उर्वरित भाग स्वस्त पॉलिस्टरचा असतो. ‘सिल्की टच’ / ‘सिल्क-लाइक’: अशा प्रकारच्या मजकुरात तुमचे लक्ष वेधून घेण्यासाठी लक्झरी शब्दांचा वापर केला जातो. मात्र सामान्यतः मागे असलेल्या बारीक अक्षरांतील माहितीवरून असे समजते की, प्रत्यक्षात हा कपडा 100% स्वस्त पॉलिस्टर आहे. ‘डिझाइन्ड इन इटली’: या लेबलमध्ये इटालियन फॅशनच्या प्रतिष्ठेचा आधार घेतला जातो. प्रत्यक्षात कपड्याचे कटिंग, शिलाई आणि उत्पादन एखाद्या कमी खर्च असलेल्या परदेशी कारखान्यात झालेले असते. ‘व्हेगन लेदर’: ही एक मार्केटिंग टर्म आहे. याचा वापर एखादे उत्पादन प्राण्यांसाठी सुरक्षित आणि प्रीमियम असल्याचे भासवण्यासाठी केला जातो. प्रत्यक्षात ते बहुतांश वेळा पॉलियुरेथेन (पीयू) किंवा पीव्हीसीसारख्या प्रमाणित प्लास्टिकपासून बनवलेले असते. ‘नॅचरल वूल ब्लेंड’: ‘नॅचरल’ हा शब्द आपली दिशाभूल करतो. कपड्यांमध्ये बहुतांश प्रमाणात सिंथेटिक नायलॉन किंवा पॉलिस्टर आहे आणि लोकर खूपच कमी आहे, ही गोष्ट लेबलमध्ये बऱ्याचदा लपवली जाते. ‘सस्टेनेबल पॉलिस्टर मिक्स’: स्वतःला पर्यावरणपूरक दाखवण्यासाठी ब्रँड्स याचा वापर करतात. यात कदाचित प्लास्टिकचा खूप छोटा भागच रिसायकल केलेला (पुनर्वापर केलेला) असू शकतो, तर उर्वरित भाग हा मूळ, तेलआधारित पॉलिस्टर असू शकतो. ‘प्रीमियम सॉफ्ट-टच टेक फॅब्रिक’: हे ऐकायला एखाद्या महागड्या, हायटेक शोधासारखे वाटते. पण यात वापरलेले मूळ साहित्य हे सामान्य नायलॉन किंवा पॉलिस्टर असते, ज्यावर बेसिक केमिकल सॉफ्टनरची प्रक्रिया केलेली असते. ‘लिनेन लूक’: हा शब्द खऱ्या फ्लॅक्स लिनेनच्या हलक्याफुलक्या, उन्हाळ्यासाठी योग्य असलेल्या स्टाइलची जाणीव करून देतो. पण प्रत्यक्षात हे एक स्वस्त सिंथेटिक मेश (जाळी) असते, ज्याचे विणकाम लिनेनच्या टेक्श्चरसारखे केलेले असते. इंडस्ट्रीतील तज्ज्ञ सांगतात की, अनेक कारखाने उत्पादन खर्च कमी करण्यासाठी खऱ्या फायबरला पर्यायी गोष्टी वापरतात. शेवटी तयार मालाची तपासणीही खूप कमी प्रमाणात होते, कारण ती खर्चिक असते आणि चुकीची माहिती दिल्यास त्यावरील दंडही खूप जास्त नसतो. लोकांमध्ये पॉलिस्टरचा स्वीकार कदाचित कमी असू शकतो, पण उत्पादनाच्या दृष्टिकोनातून हे सर्वात लोकप्रिय फायबर बनलेले आहे. जागतिक फायबर उत्पादनात याचा वाटा निम्म्याहून अधिक आहे. फंडा असा आहे की, परिधान केल्याने आनंद आणि समाधान मिळाले पाहिजे. आणि कोणत्याही ग्राहकाने कपड्यांच्या रचनेची सत्यता पडताळण्यासाठी सध्या तरी एकच मार्ग आहे- ट्राय अँड टेस्ट मेथड (वापरून पाहण्याची पद्धत). एखादे लेबल पाहून खरेदी केलेला कपडा जर तुमच्या अंगाला आरामदायक वाटला नाही, तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि पुढच्या वेळी तो विकत घेऊ नका.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *