आदित्य ठाकरे : भरपावसात आदित्य ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद, म्हणाले - 'हे बंडखोर नव्हते, गद्दारच होते'

आदित्य ठाकरे : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. पण अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. या प्रकरणावरुन न्यायालयीन लढाई सुरु आहे तर दुसरीकडे शिवसेनेतून बाहेर पडलेल्या बंडखोरावर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे वारंवार निशाणा साधत आहेत. बुधवारी आदित्य ठाकरे यांची बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रा झाली यावेळी त्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. ‘गद्दार हे गद्दारच असतात. त्यांचे नाव कितीही बदलले, त्यांनी कितीही गट बदलले तरी गद्दारीचा शिक्का त्यांच्या माथ्यावरून कधीच पुसला जाणार नाही.’, अशी आदित्य ठाकरे यांनी खडसून टीका केली

आदित्य ठाकरे यांनी बुधवारी वडाळा येथील शिवसेना शाखा क्र. १७८ ला आणि भायखळ्यातील आग्रीपाडा येथील शिवसेना शाखा क्रमांक 212 ला भेट दिली. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली. आदित्य ठाकरे यांनी जोरदार पाऊस पडत असताना सुद्धा शिवसैनिकांशी संवाद थांबवला नाही. आदित्य ठाकरे यांची भरपावासातील ही सभा चांगलीच चर्चेत आली आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांनी बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला.

यावेळी ते म्हणाले की, ‘पण गद्दारांची पोटदुखी हीच असेल की, उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे कधी विधानभवनात गेले नव्हते. त्यांचे जे काही धंदे सुरू होते, ते आम्ही कधी बघितले नव्हते. पहिल्यांदा हे सगळं दिसायला लागलं, म्हणून त्यांना पोटदुखी सुरू झाली असेल. साधारणत: दिवाळीच्या आसपास एका आठवड्यात उद्धव ठाकरेंवर एक नव्हे तर दोन वेळा शस्त्रक्रिया झाल्या होत्या. यावेळी बंडखोर आमदारांनी आपल्यासोबत कोण-कोण येतंय? यासाठी जुळवा-जुळव सुरू केली. आपण मुख्यमंत्री बनतोय का? यासाठी चाचपणी केली. ही कसली राक्षसी वृत्ती किंवा महत्त्वाकांक्षा असेल? राजकारण म्हणून ही बाब सोडून द्या. पण उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया झाली असताना ते माणुसकी देखील विसरून गेले. आता ते स्वत:ला बंडखोर म्हणत आहेत. पण बंडखोर कोण असतो? ज्याच्यात बंड करण्याची ताकद असते, हिंमत असते. तो एकाच ठिकाणी उभं राहून सांगू शकतो, हे चुकीचं सुरू आहे.’

तसंच, आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, ‘यांच्याविरोधात मी बंड करतोय. पण हे बंडखोर नव्हते, हे गद्दारच होते. कारण हे येथून पळून सुरतला गेले आणि सुरतहून गुवाहाटीला गेले. तिथे जाऊन मजा-मस्ती केली. ‘सरकार चालवताना आपण मुंबईला सगळ्यात जास्त लक्ष दिले. उद्धव ठाकरे चांगला माणूस असं लोकं म्हणतात.’, असे देखील त्यांनी सांगितले. तसंच, ‘बरबटलेलं राजकारण पाहून तरुणांना राजकारणात यावंसं वाटेल का? कोणत्याही गटाचा शिक्का मारला तरी गद्दार हे गद्दारच असतात. गद्दार हाच खरा शिक्का.’, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply