पुणे: सदाशिव पेठेत पोलिसांच्या भरधाव व्हॅनचा थरार; चार-पाच वाहनांना उडवले, विश्रामबाग पोलिसांकडून चालक ताब्यात

पुणे: अत्यंत गजबजलेल्या आणि दाट वस्तीच्या सदाशिव पेठ परिसरात शुक्रवारी सायंकाळी पोलिसांच्या एका भरधाव व्हॅनने अक्षरशः भीषण धुमाकूळ घातला. नियंत्रण सुटलेल्या या पोलीस व्हॅनने समोर येणाऱ्या टेम्पो, कार आणि रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ४ ते ५ वाहनांना जोरदार धडक देत अक्षरशः चिरडले. पुणे विद्यार्थी गृहाजवळ देशमुखवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास घडलेल्या या थरारक अपघातामुळे संपूर्ण परिसरात एकच पळापळ उडाली असून मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पोलीस व्हॅनचा चालक शुक्रवारी सायंकाळी पुणे विद्यार्थी गृहासमोरून जात असताना अचानक त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्ता अत्यंत अरुंद असल्याने भरधाव व्हॅनवरील ताबा पूर्णपणे सुटला आणि या व्हॅनने आधी समोरून येणाऱ्या एका कारला आणि रिक्षाला भीषण धडक दिली. एवढ्यावरच न थांबता या अनियंत्रित व्हॅनने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या अनेक दुचाकींनाही जोरदार धडक दिली, ज्यामुळे या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, ज्या वेळी हा अपघात घडला त्या वेळी रस्त्याच्या कडेला किंवा आजूबाजूला लहान मुले अथवा नागरिक उभे नव्हते, त्यामुळे एक मोठी जीवितहानी टळली असून कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

अपघात घडल्यानंतर घटनास्थळी तात्काळ नागरिकांची मोठी गर्दी जमली. व्हॅनमधून खाली उतरलेल्या चालकाची अवस्था पाहून तो मद्यधुंद असल्याचा तीव्र संशय स्थानिक नागरिकांना आला. नागरिकांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून व्हॅनचालक बाळासाहेब खैरे याला ताब्यात घेतले आहे.

या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी सांगितले की, हा रस्ता अत्यंत अरुंद असून चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला, ज्यामध्ये चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. आम्ही व्हॅनचालक खैरे याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर योग्य कायदेशीर कारवाई आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच चालक मद्यधुंद अवस्थेत होता किंवा कसे, हे स्पष्ट करण्यासाठी त्याची वैद्यकीय चाचणी केली जात असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *