Techie and Parents Die After Gas Leak Explosion in Kharadi!

पुणे: गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; खराडीत आयटी इंजिनिअरसह आई-वडिलांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू!

Techie and Parents Die After Gas Leak Explosion in Kharadi!
पुणे:  खराडी परिसरातील खांदवेनगर येथील 'फॉर्च्युन सिटी' इमारतीत शुक्रवारी सकाळी झालेल्या गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे.
पांडुरंग विष्णू गित्ते (वय ३५), त्यांचे वडील विष्णू मुंजाजी गित्ते (वय ६०) आणि आई वृंदाविनी विष्णू गित्ते (वय ५५) अशी या दुर्दैवी मृतांची नावे आहेत.

नेमकी घटना कशी घडली? मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास पांडुरंग गित्ते हे घरातील संपलेला गॅस सिलेंडर बदलून नवीन सिलेंडर जोडत होते.
यावेळी सिलेंडरच्या नोझलमधून गॅसची मोठी गळती झाली. गॅस गळतीचे लक्षात येताच गित्ते कुटुंबीयांनी सिलेंडर बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तो स्वयंपाकघरातून हॉलमध्ये आणला.

मात्र, हॉलमधील देवघरात असलेला पेटता दिवा गॅसच्या संपर्कात आला आणि काही क्षणातच मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. पाच वर्षांच्या बालिकेचा चमत्कारिक बचाव: या स्फोटाचा तडाखा इतका तीव्र होता की घरातील फर्निचर, टीव्ही आणि इतर साहित्याचे प्रचंड नुकसान झाले.
यावेळी पांडुरंग यांची पत्नी राजश्री आंघोळीसाठी बाथरूममध्ये असल्याने त्या बचावल्या. तर, त्यांची ५ वर्षांची मुलगी निहारिका बाल्कनीमध्ये अडकली होती. शेजाऱ्यांनी तिला बाल्कनीतून उडी मारण्यास सांगितल्यावर तिने उडी मारली आणि खाली उपस्थित असलेल्या शेजाऱ्याने तिला सुरक्षित झेलले.
या घटनेत निहारिका किरकोळ जखमी झाली आहे.

कुटुंबाचा आधार हरपला:पांडुरंग गित्ते हे एका खासगी कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. मूळचे बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील नंदागौळ गावचे असलेले हे कुटुंब पुण्यात स्थायिक होते. या दुर्घटनेत कुटुंबातील तीन महत्त्वाचे सदस्य गमावल्याने परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली, मात्र तोपर्यंत तिघेही गंभीररीत्या भाजले होते. ससून रुग्णालयात उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाला. खराडी पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.



महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *