पुणे : प्रेमसंबंधाला नकार देणाऱ्या तरुणीला तरुणाने दिली धमकी

पुणे : ओळखीच्या तरुणीने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर तरुणाने तिला भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. हि घटना शुक्रवारी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास कुमठेकर रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तरुणाला अटक केली.

प्रज्वल संजय जाधव (वय 22, सध्या रा. मुंजोबाचा बोळ, नारायण पेठ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तरूणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणी शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आली आहे. तर फिर्यादी तरुणी व जाधव यांची एकमेकांशी काही वर्षांपासून ओळख आहे. त्याने यापुर्वीच तरुणीला प्रेमसंबंध ठेवण्याबाबत विचारणा केली होती, त्यास तरुणीने नकार दिला होता.

दरम्यान, शुक्रवारी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास तरुणी कुमठेकर रस्त्यावरुन जात असतानाच जाधव याने तरुणीला अडविले. त्यानंतर त्याने तरुणीला "माझ्याशी प्रेमसंबंध न ठेवल्यास तुझे करिअर खराब करतो,' अशी धमकी दिली. या प्रकारामुळे तरुणीने थेट विश्रामबाग पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी जाधव यास अटक केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल कोलंबीकर तपास करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *