एन. रघुरामन यांचा कॉलम:एआय आजही कृत्रिमच आहे! म्हणूनच खऱ्या बुद्धिमत्तेची गरज

मी दोन अशा व्यक्तींना ओळखतो, एक -ज्यांनी या मार्चमध्ये एआयच्या मदतीने युरोप आणि अमेरिकेच्या संपूर्ण ट्रिपचे नियोजन केले. दुसरी -त्यांची मुलगी, जिने अलीकडेच 12 वीची परीक्षा दिली आणि एआयच्या मदतीनेच कॉलेज प्रवेशाची योजना आखली. साहजिकच वेगवेगळे पर्याय देण्याच्या बाबतीत हे तंत्रज्ञान कोणत्याही ट्रॅव्हल एजंट किंवा समुपदेशकापेक्षा अधिक वेगवान होते. इतक्या वेगाने व इतके जास्त पर्याय पाहून दोघेही इतके प्रभावित झाले की त्यांनी एआयच्या अंतिम सूचनांच्याच पालनाचा निर्णय घेतला. कोर्स आणि कॉलेजची निवड करून दोघेही ट्रिपवर निघाले आणि त्यांना पहिला धक्का तेव्हा बसला, जेव्हा वर्ल्ड ट्रेड सेंटर स्टेशनवर त्यांची ट्रेन चुकली. डब्ल्यूटीसी स्टेशन हे खरं तर एक ट्रान्सपोर्टेशन हब आहे, जिथून न्यूजर्सी आणि मॅसाच्युसेट्ससारख्या राज्यांसाठी थेट ट्रेन मिळतात. यांना पाथ ट्रेन म्हणतात. मुलीने तिची तिकिटे पुन्हा तपासली नसल्याने केवळ तिची ट्रेनच सुटली नाही तर तिचे कनेक्टिंग स्टेशनही वेगळे होते. एआय ट्रॅव्हल प्लॅनिंगबाबतच्या सर्वत्र सुरू असलेल्या चर्चेदरम्यान तिची इच्छा होती की, आपल्या संपूर्ण ट्रिपसाठी एआयव्यतिरिक्त इतर कुठेही संशोधन करू नये. तिची सर्वात मोठी चूक ही होती की, तिने हा प्रयोग अशा ठिकाणासाठी केला, जिथे ती आधी कधीही गेली नव्हती. ट्रेन सुटल्यानंतर जेव्हा तिने मला स्टेशनवरून फोन केला तेव्हा माझ्या लक्षात आले की ती चुकीच्या ठिकाणी उभी होती. याआधी तिने हॉटेलवरही पायी जाण्याचा निर्णय घेतला होता. कारण एआयने सांगितले होते की टॅक्सी महाग पडेल आणि हॉटेल फक्त ६०० मीटर अंतरावर आहे. पण एआयला हे माहीत नव्हते की त्या दिवशी मुसळधार पाऊस पडेल आणि भारतीय लोक केवळ दोन सुटकेस नाही, तर हँडबॅग आणि लॅपटॉपही सोबत ठेवतात. मुसळधार पावसात सामान घेऊन चालताना दोघेही पूर्णपणे भिजले, ज्यामुळे पुढचे दोन दिवस त्यांना ताप आला आणि प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी वेळच मिळाला नाही. तेव्हा त्यांना जाणीव झाली की, मुलीच्या एआय-आधारित कॉलेज ॲडमिशन कौन्सिलरचा सल्लाही अमेरिकेत कॉलेज निवडताना चुकीचा ठरू शकतो. त्यानंतर त्यांनी पैसे खर्च करून मानवी सल्ला घेण्याचा निर्णय घेतला. कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तेव्हाच चांगले मार्गदर्शन मिळते, जेव्हा त्यात माणसाचा सहभाग असतो. कारण समुपदेशक बॉट्सची माहिती फिल्टर करून विद्यार्थ्यांना सल्ला देतात. विशेषतः जेव्हा त्यांना अर्ज भरण्यासाठी स्पष्टतेची गरज असते. शाळांमध्ये एआयच्या वापराचे समर्थक राहिलेले मॅसाच्युसेट्स स्कूल कौन्सिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अली रोबिडॉक्सही मानतात की, विद्यार्थ्यांवर समुपदेशकांचा जो प्रभाव असतो, तंत्रज्ञान त्याची बरोबरी करू शकत नाही. असे का, तर माणसाला माहीत असते की त्यांच्या खासगी आयुष्यातील बारकावे कसे समजून घ्यावेत. चॅटबॉट फक्त विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी पाहतो आणि त्यांना त्या देशातील अधिक स्पर्धात्मक कॉलेजांमध्ये अर्ज करण्यापासून परावृत्त करू शकतो. कुणाच्या घरी निधन झाले असल्यास चॅटबॉट्स अशा विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे आकलन करू शकत नाहीत. एका समुपदेशकानुसार, ‘एआय तुम्हाला ओळखत नसल्याने ते तुम्हाला फक्त तेच सांगतात, जे पब्लिक डोमेन उपलब्ध आहे.’ चॅटबॉट्स बनवणाऱ्या कंपन्याही याच्याशी सहमत आहेत की, पदवीसाठी योग्य कॉलेज निवडण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना मोठ्यांचा सल्ला आवश्यक असतो. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाण्यासाठी मदत करण्यासाठी एआयचा वापर करणाऱ्या ‘मेनस्टे’ प्लॅटफॉर्मचे संस्थापक अँड्य्रू मॅग्लियोज्जी म्हणतात की, ‘या प्रक्रियेत माणसांचा सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण एआय अजूनही विकसित होत आहे.’ फंडा असा की, आपण वेग आणि विश्वासार्हता यामध्ये अडकून असा विचार करू लागतो की एआय आपल्यापेक्षा सरस आहे. सध्या एआय वापरण्याचा सर्वात योग्य मार्ग हाच की, त्याच्या वेगाचा फायदा घ्यावा आणि नंतर अनुभवी माणसांना सांगावे की त्यांनी या माहितीचे विश्लेषण आपल्या बुद्धीने करावे.

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *