जळगाव: जिल्ह्यात सकाळीच भूकंपाचे जोरदार धक्के! रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेची नोंद, चोपडा, यावल, भुसावळ आणि मुक्ताईनगर हादरले

जळगाव: शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सकाळीच भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सकाळी ९:१८ ते ९:२० वाजेच्या सुमारास अचानक जमिनीला कंप जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये काही काळासाठी प्रचंड भीती आणि घबराट पसरली. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ मॅग्निट्यूड एवढी नोंदवली गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भूकंपाचे केंद्र मध्य प्रदेशातील खरगोन भागात असल्याचे सांगितले जात आहे.

कुठे आणि कसे जाणवले धक्के?
जळगाव जिल्ह्यातीतल विविध तालुक्यांमध्ये या भूकंपाचे हादरे स्पष्टपणे जाणवले. यामध्ये विशेषतः चोपडा, यावल, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर आणि बोदवड या भागांतील नागरिकांना भूकंपाचा झटका तीव्रतेने जाणवला. सकाळी नागरिक आपापल्या दैनंदिन कामात आणि व्यापात व्यस्त असतानाच अचानक घरातील वस्तू हलू लागल्या, पलंग आणि बेड थरथकू लागल्याचा अनुभव अनेकांनी घेतला. काही क्षणांसाठी जमीन थरथरल्याने नागरिकांनी ताबडतोब घराबाहेर मोकळ्या जागेत आणि रस्त्यावर धाव घेतली.

भीतीचे वातावरण आणि प्रशासकीय स्थिती:
काही महिन्यांपूर्वी देखील जळगाव जिल्ह्यातील काही भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची घटना घडली होती. त्यामुळे शनिवारी सकाळी पुन्हा एकदा जमीन हादरल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांच्या मनात जुन्या आठवणी ताज्या होऊन भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोकांनी एकमेकांना फोन करून आपल्या भागात हादरे बसल्याची विचारणा केली आणि काही वेळ गावात व शहरात याचीच चर्चा सुरू होती.

दरम्यान, या भूकंपाच्या धक्क्यामुळे सुदैवाने जळगाव जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. सर्व नागरिक सुरक्षित असून आपत्कालीन यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. प्रशासनाकडून अधिकृत माहिती आणि सविस्तर अहवाल जाहीर झाल्यानंतर या घटनेबाबतची नेमकी अधिक स्पष्टता समोर येईल.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *