पुणे: पिंपरी-चिंचवडमधील शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार!

पुणे: वाकडमधील शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणात पोलिस तपास करीत असून, लवकरच आरोपपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मंगळवारी (दि. १३) वाकड येथे दिली. पोलिसांकडून संबंधित बाबींची कागदोपत्री नोंद करून पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

शिल्पा गवारे यांच्या आत्महत्याप्रकरणी वाकडमधील शिल्पाचे माहेर असणाऱ्या कलाटे कुटुंबीयांची रहाटकर यांनी भेट घेऊन संबंधित घटनेची माहिती घेतली. यावेळी भाजपचे आमदार शंकर जगताप, नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे, शिल्पाचे भाऊ संतोष कलाटे उपस्थित होते. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने यापूर्वीच दखल घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या की, आजच्या काळात हुंडा मागितला जात नसल्याचे वरवर दिसत असले, तरी प्रत्यक्षात हुंड्याच्या कारणावरून मुलींना त्रास दिला जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशा घटना आणि त्यामागील मानसिकता चिंताजनक असून, त्या रोखण्यासाठी समाजाने एकत्र येऊन जागरूक होण्याची आणि आवाज उठविण्याची गरज आहे.
हुंड्याच्या मानसिकतेविरोधात जनजागृती आवश्यक
हुंडा मागणीचे स्वरूप बदलले असले, तरी त्यातून मुलींना होणारा त्रास आणि छळ हा गंभीर विषय आहे. अशा अनेक घटना समोर येत असल्याने समाजाने याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. हुंड्याच्या कारणावरून मुलींना त्रास देण्याची मानसिकता बदलण्यासाठी सामाजिक पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे रहाटकर म्हणाल्या.

कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची
रहाटकर म्हणाल्या की, महिलांच्या संरक्षणासाठी देशात सक्षम कायदे आहेत. संबंधित प्रकरणांमध्ये कोणती कलमे लागू होतात, त्यानुसार जामिनाबाबत निर्णय घेतला जातो. कलाटे प्रकरणात लागू करण्यात आलेली कलमे गंभीर स्वरूपाची असल्याने संबंधितांना अद्याप जामीन मिळालेला नाही. केवळ कायद्यांच्या आधारे अशा घटना रोखता येणार नाहीत, तर समाजानेही अशा प्रकारांविरोधात जागरूक राहून अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे आवश्यक आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *