सणासुदीच्या पार्श्वभूमीवर एफडीएचा दणका! अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या मुंबईतील ८ आस्थापनांवर कारवाई; ५ परवाने निलंबित तर ३ रद्द

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल आणि अन्न व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी धडक मोहीम उघडली आहे. मुंबई शहरामध्ये अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल आठ प्रमुख आस्थापनांवर एफडीतर्फे कठोर कारवाई करण्यात आली आहे. या तपासणी मोहिमेदरम्यान अन्नपदार्थांची हाताळणी, साठवणूक आणि परिसरातील स्वच्छतेबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्याने पाच आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर तिघांचे परवाने पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाकडून (१ ते ५ ऑक्टोबर दरम्यान) राबविण्यात आलेल्या या विशेष तपासणी मोहिमेत मुंबईतील नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सच्या युनिट्सची कसून तपासणी करण्यात आली. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कॅफे सुलतान (कलिना), लो फ्रेश फूड प्रा. लि. (मरोळ, अंधेरी पूर्व), कंट्री क्लब (अंधेरी पश्चिम), सुरज लामा मोमोज (अंधेरी पश्चिम) आणि कॅफे पकीझा (सांताक्रूझ पश्चिम) या पाच ठिकाणी अन्नपदार्थ तयार करताना, हाताळताना किंवा साठवताना आवश्यक स्वच्छता आणि सुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या पाचही ठिकाणचे अन्न परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.

दुसरीकडे, एस. व्ही. रोड विलेपार्ले येथील 'ब्लिंकिट' (Blinkit) चे युनिट, विलेपार्ले येथील 'कोपनहेगन हॉस्पिटॅलिटी' आणि वांद्रे पश्चिम येथील 'ईटक्लब्स' या तीन महत्त्वाच्या ठिकाणांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे नियमभंग आढळले. अन्न व्यवसायाशी संबंधित परवान्यातील अटी-शर्ती तसेच अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांची पायमल्ली केल्यामुळे या तिन्ही ठिकाणचे परवाने पूर्णपणे रद्द (Cancel) करण्यात आले आहेत.

सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या अशा आस्थापनांवर यापुढेही एफडीतर्फे कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे. अन्नपदार्थामध्ये काही भेसळ किंवा इतर गैरप्रकार आढळल्यास नागरिकांनी तात्काळ १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहन एफडीएकडून करण्यात आले आहे.

 



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *