सेकंदाच्या रागात उद्ध्वस्त झालं कुटुंब! साताऱ्यात शिक्षक बापानं १७ वर्षांच्या लेकीला क्रिकेटच्या बॅटनं संपवलं; टीव्ही-मोबाईलच्या वादातून घडली भीषण घटना

सातारा: सातारा शहरातून एक अत्यंत हादरवून टाकणारी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सेकंदाच्या रागात आणि कौटुंबिक वादातून एका शिक्षक बापानेच आपल्या १७ वर्षीय पोटच्या मुलीची क्रिकेटच्या बॅटने डोक्यात व शरीरावर बेदम प्रहार करून निर्घृण हत्या केली आहे. आर्या पुरुषोत्तम कदम (वय १७) असे मृत मुलीचे नाव असून, या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी आरोपी पिता पुरुषोत्तम संपत कदम याला अटक केली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मूळचे चंचळी (ता. कोरेगाव) येथील रहिवासी असलेले पुरुषोत्तम कदम आणि त्यांची पत्नी शीला हे दोघेही पेशाने शिक्षक आहेत. त्यांची १७ वर्षीय मुलगी आर्या हिचे टीव्ही आणि मोबाईलच्या वापरावरून व इतर घरगुती कारणांवरून पालकांसोबत वारंवार खटके उडत असत. १७ वर्षीय आर्याला चुकीच्या संगतीमुळे उद्धट वर्तनाची सवय लागल्याचे सांगितले जात आहे. घरगुती कलह व वाद टाळण्यासाठी पालकांनी तिचे मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन तसेच वैद्यकीय उपचारही सुरू केले होते. मात्र, तरीही तिच्या वागण्यात कोणताही बदल झाला नव्हता. यापूर्वी मे महिन्यात तिने वडिलांना मारहाण करून जखमी केल्याचीही माहिती समोर आली आहे.

शनिवारी पुन्हा एकदा घरात टीव्ही आणि मोबाईलच्या मुद्द्यावरून वाद झाला. या वादात रागाच्या भरात आर्या ही बॅट घेऊन वडिलांच्या अंगावर धावून गेली. यादरम्यान झालेल्या झटापटीत संतप्त झालेल्या शिक्षक पित्याने आर्याच्याच हातातील किंवा घरातील क्रिकेटची बॅट खोसून तिच्या डोक्यात आणि शरीरावर तीव्र प्रहार केले. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन आर्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपी पित्याला बेड्या ठोकल्या. या दुर्दैवी घटनेमुळे सातारा परिसरात मोठी हळहळ व संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून, एका क्षणाच्या रागात संपूर्ण कुटुंब कसे उद्ध्वस्त झाले, याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *