पुणेः लाडक्या बाप्पाला निरोपाची जय्यत तयारी पूर्ण; पुण्यात मानाच्या गणपतींसह विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी!

पुणेः मानाच्या गणपतींसह प्रमुख मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली असून, रांगोळ्यांच्या मनोहारी पायघड्या, फुलांनी सजविलेला रथ, ढोलताशांचा गजर आणि 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, च्या जयघोष अशा दिमाखदार वातावरणात शुक्रवारी (दि. २५) लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. विविध संकल्पनेप्रमाणे तयार करण्यात आलेले रथ, जिवंत देखावे आणि जनजागृतीपर संदेश यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण ठरणार आहे.

पुण्यात वैभवशाली आणि ऐतिहासिक परंपरा असलेल्या विसर्जन मिरवणुकीला अनंत चतुर्दशीदिनी शुक्रवारी (दि. २५) सकाळी ९.३० वाजता मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रारंभ होणार आहे. त्यानंतर बेलबाग चौक येथून १०.१५ वाजता मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळापासून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होईल. दरम्यान, सार्वजनिक गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक सुरळीत, निर्विघ्नपणे आणि वेळेत पार पाडण्यासाठी महापालिका आणि पोलिस प्रशासन देखील सज्ज झाले आहे.

मानाचा पहिला कसबा गणपती
पुण्याच्या गणेशोत्सव परंपरेचे मानचिन्ह असलेला मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या 'श्रीं' ची पालखी उत्सव मंडपातून पारंपरिक रजत पालखीतून निघणार आहे. रमणबाग युवा मंच, परशुराम ढोल-ताशा पथक आणि रुद्रगर्जना ढोल-ताशा पथक यांसह विविध दिंड्या तसेच कामयानी प्रशालेचे विशेष मुलांचे दिंडीचा सहभाग असणार आहे. यंदाच्या मिरवणुकीत विशेष आकर्षण असलेला पर्यावरणपूरक 'हरित रथ' पर्यावरणसंवर्धनाचा संदेश देणार असून, त्यावर पारंपरिक नगारा व चौघड्याचे वादन होणार आहे. यातून महाराष्ट्राच्या समृद्ध वाद्यपरंपरेचे दर्शन घडणार आहे. तसेच, बँक ऑफ इंडियाचे अधिकारी व कर्मचारी 'ड्रग फ्री इंडिया' अर्थात 'नशामुक्त भारत' अभियानांतर्गत जनजागृतीपर संदेश देणार आहेत.

मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी
श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत सतीश आढाव यांचे नगारा वादन, न्यू गंधर्व ब्रास बँड, विघ्नहर्ता ढोल-ताशा पथक, ताल ढोल-ताशा पथक, शिवमुद्रा ढोल-ताशा पथक, पारंपरिक वेशात मंडळाचे महिला व पुरुष कार्यकर्ते, "विष्णूनाद" चे कार्यकर्ते पालखी पुढे शंख नाद करतील. अब्दागिरी, मानचिन्हांसह श्री गणराय विराजमान असलेली चांदीची पालखी कार्यकर्ते स्वतः आपल्या खांद्यावरून वाहून मिरवणुकीमध्ये सहभागी होतील.

मानाचा तिसरा गुरुजी तालीम
पुण्याचा राजा असलेला गुरुजी तालीम मंडळ परंपरेला शोभेल अशी पारंपरिक पद्धतीत निघणाऱ्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारा वादन, अश्वराज ब्रास बँड, नादब्रह्म ढोल ताशा पथके, गर्जना ढोल ताशा पथक, शिवगर्जना ढोल ताशा पथक सहभागी होणार आहे. स्वप्निल व सुभाष सरपाले यांनी बनविलेल्या " माता महाकाली' ह्या फुलांच्या आकर्षक रथातून श्रीं ची मिरवणूक निघणार आहे.

मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती
श्री तुळशीबाग गणपतीची मिरवणूक भव्य विष्णू रथातून सहभागी होणार आहे. १६ फूट रुंद २२ फूट लांब ३२ फूट उंच रथावर विष्णूची १० फुट उंचीची मूर्ती असून, ती हायड्रोलिकच्या साहाय्याने उंची कमी करता येणार आहे. कमळाच्या फुलात गणराया बसलेले समोर जलपरी स्वागत करत असून, गाय, हत्ती नाग आणि मत्स्य आकर्षक फुलांमध्ये होणार आहे.

मानाचा पाचवा केसरीवाडा
केसरीवाडा गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीला महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी साडेदहा वाजता सुरुवात होणार आहे. इतिहास प्रेमी मंडळातर्फे थोर समाज सुधारक महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त जिवंत देखावा असणार आहे. लोकमान्य टिळक व आगरकर डोंगरीच्या कारागृहातून सुटल्यानंतर त्यांचे महात्मा फुले यांनी केलेले स्वागत हा देखाव्याचा विषय असेल. प्रथेप्रमाणे फुलांनी सजविलेल्या पालखीत गणराया विराजमान असतील. यावेळी केसरी गणेशोत्सवाचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. गीताली टिळक, विश्वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक रौनक रोहित टिळक हे मिरवणुकीत सहभागी असणार आहेत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्या वतीने यंदा श्री वक्रतुंड रथामध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान होणार असून, आकर्षक विद्युत रोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे, यंदाची प्रतिकृती असलेल्या वृंदावन मधील प्रेम मंदिराच्या विषयाप्रमाणे सांगता मिरवणूक रथाची मांडणी करण्यात आली आहे. रथाची संकल्पना भारतीय मंदिर वास्तु कलेवर आधारित असून, त्यात पारंपरिक शिल्पकला आणि आधुनिक फॅब्रिकेशनचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे. मिरवणुकीत जय गणेश अमली पदार्थ मुक्त भारत अभियान जनजागृती करणारा मानवसेवा रथ अग्रभागी असून, त्यामध्ये विनायक आणि रोहन देवळकर यांचा चौघडा व प्रमोद गायकवाड यांचे सनई वादन देखील होणार आहे.

अखिल मंडई मंडळ
अखिल मंडई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी कोणार्क सूर्य मंदिराच्या वास्तुशैलीवर आधारित रथ साकारण्यात आला आहे. सुमारे ३२ फूट उंचीच्या या रथावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. सुमारे ३२ फूट उंच असलेल्या या रथावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार असून, रथ हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण असणार आहे. विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यवृंद आणि वाद्य पथकांचा सहभाग असणार आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचे नगारा वादन त्यामागे न्यू गंधर्व बँड तसेच शिवगर्जना पथकाचे वादन मिरवणुकीत असणार आहे. कलादिग्दर्शक विशाल ताजणेकर यांनी रथ साकारला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *