लाइनमन:जीव तळहातावर घेऊन प्रकाश पेरणारी माणसं; काळोखाशी झुंज देणारे पडद्यामागचे नायक!

लाइनमन जीव धोक्यात घालून आपल्या सेवेत असतात. लाइट गेली की, महावितरणच्या ऑफिसमधला फोन खणखणतो. त्यावेळी रात्र असो की दिवस, कुठलाही ऋतू असो. तो कुठल्याही कामात असो, हे सारे सोडून लाइनमन दुरुस्तीच्या कामाला लागतो. त्यांच्यामुळेच आपण प्रकाशात राहतो. या लाइनमच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 4 मार्च हा दिवस ‘लाइनमन दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त... ते आपले जनमित्र अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासारखीच वीज ही आजच्या जीवनातील मूलभूत गरज बनली आहे. घरातील दिवा, पंखा, पाणीपुरवठा, मोबाईल चार्जिंग, रुग्णालये, उद्योगधंदे सगळे काही विजेवर अवलंबून आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला की जीवनाची गतीच थांबते. महाराष्ट्रातील कोट्यवधी नागरिकांच्या घराघरांत वीज पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम महावितरण अर्थात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित करत आहे. या विशाल यंत्रणेचा खरा कणा म्हणजे जनमित्र - आपले लाइनमन. अदृश्य पण अत्यावश्यक सेवा वीज ही दिसत नाही, पण तिचे अस्तित्व प्रत्येक क्षणी जाणवते. विजेची निर्मिती, पारेषण आणि वितरण या टप्प्यांतून ती ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचते. या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात आव्हानात्मक टप्पा म्हणजे वितरण. शहरातील उंच इमारतींपासून ते दुर्गम डोंगराळ भागातील लहानशा वाड्यांपर्यंत अखंड वीजपुरवठा राखण्यासाठी जनमित्रांना 24 तास तत्पर राहावे लागते. चुकीला माफी नसते आपल्या घराचा वीजपुरवठा काही मिनिटांसाठी खंडित झाला तरी अस्वस्थता वाढते; परंतु त्या मागे लाइनमनना कोणत्या परिस्थितीत काम करावे लागते, याची जाणीव अनेकांना नसते. रात्री-अपरात्री, मुसळधार पावसात, कडाक्याच्या उन्हात किंवा वादळाच्या झंझावातातही ते उंच खांबांवर चढून दुरुस्ती करतात. वीजयंत्रणेत एक क्षणाची चूकही जीवघेणी ठरू शकते कारण छोट्याशा चुकीलाही वीज कधीच माफ करत नाही. लाखों घरात प्रकाश आणला गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राने अनेक नैसर्गिक संकटांचा सामना केला. निसर्ग व तौक्ते या चक्रीवादळांनी किनारपट्टीलगतच्या व राज्यातील इतर ठिकाणच्या वीजयंत्रणेचे मोठे नुकसान केले. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. अशा वेळी जनमित्रांनी जीवाची पर्वा न करता तुटलेल्या वाहिन्या दुरुस्त केल्या, पडलेले खांब उभे केले आणि लाखो घरांत पुन्हा प्रकाश आणला. कोरोना संकटात मोलाचे काम कोरोनाच्या संकटात संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना नागरिक घरात सुरक्षित राहू शकले कारण वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी लाईनमन सतत कर्तव्य बजावत होते. रुग्णालये, आयसोलेशन केंद्रे, लसीकरण केंद्रे या सर्व ठिकाणी अखंड वीजपुरवठा करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. विश्वविक्रमात मोलाचा वाटा महावितरणतर्फे महाराष्ट्रात एकाच महिन्यात सर्वाधिक 49,911 सौर कृषिपंप बसवण्याचा विक्रम करण्यात आला. या विक्रमाची जगातील सर्वात प्रतिष्ठित ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ म्हणून नोंद झाली. कमी काळात मोठ्या संख्येने पंप बसवण्याचा भीमपराक्रम करण्यात महावितरणच्या अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. महावितरणच्या लाईनमन मंडळींनी प्रचंड मेहनत घेऊन सौर कृषिपंपांचे प्रत्यक्ष शेतात जाऊन सर्वेक्षण वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान पेलले आणि विश्वविक्रमास हातभार लावला. 5 डिसेंबर 2025 रोजी गिनीज विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळ्यात बोलताना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनीही जनमित्रांच्या या कार्याची दखल घेतली. ‘लाईनमन ही महावितरणची लाईफलाईन आहे’, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. एकाच ध्येयाने कार्यरत महावितरणच्या ग्राहकसंख्येत दरवर्षी लाखोंची भर पडत आहे. वाढती वीजमागणी, नवीन उपकेंद्रे, हजारो किलोमीटरच्या वाहिन्या आणि वितरण रोहित्रे या सर्वांची देखभाल व दुरुस्ती करणे ही मोठी जबाबदारी आहे. यासोबतच नवीन जोडण्या देणे, थकीत बिलांची वसुली, वीजचोरीविरोधातील कारवाई अशा विविध ग्राहकसेवाही जनमित्र अर्थात लाईनमन पार पाडतात. त्यांच्या कामात शारीरिक कष्ट तर आहेतच, पण मानसिक तणावही कमी नाही. वेळेचे बंधन नाही आणि प्रतिकूल हवामानात काम सुरूच राहते. धोक्याची तर कायमच छाया. तरीही सुरक्षितपणे काम करत ग्राहकांच्या घरात प्रकाश राहिला पाहिजे या एकाच ध्येयाने ते कार्यरत असतात. कर्तव्यनिष्ठेला सलाम आपण दिवा लावतो तेव्हा त्या प्रकाशामागे असलेल्या घामाची, परिश्रमाची आणि धैर्याची आठवण ठेवणे गरजेचे आहे. लाईनमन दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून, या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम करण्याचा दिवस आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यावर अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे; परंतु त्या मागे झटणाऱ्या जनमित्रांच्या प्रयत्नांची दखल घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांच्या समर्पणामुळेच आपले जीवन प्रकाशमान आहे. काळोखाशी झुंज देत आपल्या आयुष्यात उजेड आणणाऱ्या या माणसांना लाइनमन दिनानिमित्त कृतज्ञतापूर्वक मानवंदना. (लेखक महावितरण छत्रपती संभाजीनगरचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करतात.)

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “लाइनमन:जीव तळहातावर घेऊन प्रकाश पेरणारी माणसं; काळोखाशी झुंज देणारे पडद्यामागचे नायक!

Leave a Reply to Geoffrey3819 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *