Solapur Onion News : शेतकऱ्याची थट्टा! ८२५ किलो कांदा विकला, पण पदरचाच १ रुपया द्यावा लागला; बिल व्हायरल

Solpaur News : कांद्याचे भाव अचानक कोसळल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. पेरणीचा खर्च तर सोडाच मार्केटमध्ये नेहण्याचा खर्चही शेतकऱ्यांना मिळत नाही,उलट स्वत:च्या खिशातून पैसे द्यावे लागत असल्याचे समोर येत आहे. सोलापुरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.एका शेतकऱ्याने 17 पिशवीतील 825 किलो कांदा विकला,त्यानंतरही त्याला आपल्याच खिशातील एक रुपया द्यावा लागला.

यामुळे सर्वसामान्यातून नाराजी व्यक्त करण्यात येत असून शेतकरी वर्गातही असंतोषाचं वातावरण आहे.सध्या बाजारपेठेत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात किलोमागे पाच ते आठ रुपयांची घसरण झाली आहे.कांद्याच्या दरात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात घसरण सुरूच आहे.याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बंडू भांगे या कांदा उत्पादक शेतकऱ्याने एस. एन. जावळे या कांदा अडत वापऱ्याकडे तब्बल17 पिशवी कांदा आणला होता.हे कांद्याचे वजन 825 किलो एवढे भरले. याला भाव फक्त एक रुपयाचा मिळाला, त्यामुळे 825 रुपये पट्टी झाली. मग त्यातून हमाली, तोलारी, गाडी भाडं सगळे मिळून 826 रुपये झाले.

पट्टी आली 825 रुपये आणि खर्च झाला 826 रुपये. त्यामुळे सतरा पिशव्या कांद्या विकल्यानंतरही बंडू भांगे यांना पदरचा एक रुपया आडत्याला देण्याची वेळ आली. शेतकऱ्याची ही थट्टा आहे का? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. बंडू भांगे या शेतकऱ्याला पेरणीचा खर्च तर मिळालाच नाही,उलट खिशातील पैसे द्यावे लागले.

बंडू भांगे यांच्या या व्यवहाराच्या बिलाचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोलापूर शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी एक रुपया वजा असलेली शेतकऱ्याची पट्टी फेसबुकवर पोस्ट केली आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता, 01 फेब्रुवारी रोजी बंडू भांगे या शेतकऱ्याने सोलापूर कृषी बाजार समितीत जवळपास 825 किलो कांदा विकला होता.

परंतु दर घसरल्याने कांद्याला योग्य भाव मिळाला नाही आणि सर्व पैसे वजा करून शेतकऱ्याच्या हाती काहीही आले नाही.उलट त्याला आडतीवाल्याला एक रुपया द्यावा लागला. बंडू भांगे हे शेतकरी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्याच्या दाऊदपुरचे रहिवासी आहेत.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply