Sharad Pawar : फडणवीसांचं महत्व वाढवायची गरज नाही; शरद पवार यांनी एकाच वाक्यात विषय संपवला!

Sharad Pawar On Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवर गौप्यस्फोट केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी त्यावर (देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीवरील केलेल्या गौप्यस्फोटावर) भाष्य करून त्यांचं महत्व वाढवायची गरज नाही, असे शरद पवार म्हणाले. 'सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने पुण्यात दुसऱ्या सहकार महापरिषदेचे (सकाळ महाकॉन्क्लेव्ह) आयोजन करण्यात आले आहे. या महापरिषदेचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटावर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या दाव्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, 'त्यावर भाष्य करून त्यांचं महत्व वाढवावं असं मला वाटत नाही.' दरम्यान, इतक्या दिवसांनी हा विषय का काढला या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिले. याबाबत फडणवीसांनाच विचारण्याची गरज आहे, असे पवार म्हणाले.

शरद पवार यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीवरही प्रतिक्रिया दिली. मंगळवारी निर्णय घेणार असल्याचं आज ऐकण्यात आलं आहे. बघू आता मंगळवारी काय होतं? इंटरेस्टिंग आहे. काय होतं हे सांगणं अवघड आहे, असं ते म्हणाले.

कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरणार?

शरद पवार हे कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरणार असल्याचं वृत्त होतं. त्याबाबत विचारलं असता, कसबा पोटनिवडणुकीचे उमेदवार मला भेटून गेले. त्यांनी मला एखादी चक्कर टाका असे सांगितले. आता एका ठिकाणी गेलं की दोन्ही ठिकाणी (कसबा आणि चिंचवड) जावं लागेल, असे ते म्हणाले.

दुसरीकडे, गिरीश बापट हे प्रचारात सहभागी झाल्यानंतर भाजपवर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्याबाबतही पवार यांनी भाष्य केले. बापट यांना प्रचारात आणण्याची भाजपला गरज होती का हे ठाऊक नाही. बापट यांना मी भेटून आलो होतो. त्यांची प्रकृती पाहता त्यांच्या यातना वाढू नयेत हीच अपेक्षा आहे, असे शरद पवार म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply