Ratnagiri Flood : रत्नागिरीत पावसाचा हाहाकार; मुंबई-गोवा मार्गावर कोसळली दरड, प्रसिद्ध पीर बाबरशेख दर्ग्यात शिरलं पाणी

रत्नागिरी : दक्षिण रत्नागिरीला सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपून काढले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. वहाळामधून वाहून गेल्याने जिल्ह्यातील चौथा बळी पावस येथे गेला. मुंबई-गोवा महामार्गावर निवळी येथे दरड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.

कळवंडे (ता. चिपळूण) धरणाचा भराव खचला. जिल्ह्यात नद्यांना पूर आल्याने अनेक घरांमध्ये, शेतांमध्ये पाणी शिरले. बाव नदी पूल अवजड वाहतुकीसाठी काही काळ बंद केला होता. प्रसिद्ध पीर बाबरशेख दर्ग्यामध्ये पाणी शिरले होते. सायंकाळी मात्र पावसाने थोडी उसंत घेतली होती.

दोन दिवस पावसाचे धूमशान घातले आहे. काल उत्तर रत्नागिरीला झोडपून काढले. चिपळूण, खेड, राजापूरला पूरस्थिती होती. आता या भागातील परिस्थिती नियंत्रणात आहे. रात्रीपासून दक्षिण रत्नागिरीमध्ये पावसाने हाहाकार माजवला. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) रेड अलर्ट जारी केला होता. त्यानुसार पावसाने कहर केला.

आजदेखील जिल्ह्यांत रेड अलर्ट आहे. या पावसामुळे संपूर्ण जनजीवन प्रभावित झालेले. रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा तालुक्यातील काजळी नदी आणि बावनदीला पूर आला. हरचिरी, सोमेश्वर, टेंभ्ये, तोणदे, पोमेंडी आदी भागात पाणी शिरले. मुंबई-गोवा महामार्गावरील निवळे येथे दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. परंतु, काही काळात दरड बाजूला करून मार्ग मोकळा केला.

रत्नागिरी तालुक्यातील गोळप-नवेदरवाडी येथील वाहून बेपत्ता झालेल्या प्रौढाचा मृतदेह रोहिदासवाडी वाहळात सापडला. रवींद्र कृष्णा भाटकर असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २६) रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली होती. कळवंडे (ता. चिपळूण) धरणाचा भराव खचल्याने धरणाला धोका निर्माण झाल्याची भीती होती. परंतु, याबाबत प्रशासनाने खुलासा केला असून, धरणाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले.

Mumbai-Pune Expressway Traffic Update : 'मुंबई-पुणे एक्सप्रेस वे'वर आज पुन्हा दुपारी २ ते ४ यावेळेत ब्लॉक; जाणून घ्या महत्वाची अपडेट

पावसाचा जोर कायम असल्याने बावनदी पूल अवजड वाहनांसाठी काही काळ बंद करण्यात आल्याची माहिती सरपंच तन्वी कोकजे यांनी ही माहिती दिली. लांजा तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला होता. काजळी, मुचकुंदी, बेनी, नावेरी या चारही नद्यांना महापूर आला.

पुरामुळे मठ येथील दत्त मंदिर, पन्हळे पडवण, इंदवटी सुतारवाडी, झर्ये-रिंगणे रस्ते पाण्याखाली गेले. काजळी पुरामुळे आंजणारी पुलावरील वाहतूक थांबवली होती. परंतु, पावसाचा जोर कमी झाल्याने पुन्हा सुरू करण्यात आली. संगमेश्वर तालुक्यातील नावडी-रामपेट येथेही पुरामुळे घरे पाण्याखाली गेली होती. सायंकाळी पावसाचा जोर कमी झाल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply