Ram Temple in Ayodhya: …आता तयारी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची; दोन मोठ्या शाळीग्राम शिळा अयोध्येत पोहोचल्या!

गेल्या तीन वर्षांपासून अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांचे भव्य मंदिर उभारण्याचं काम सुरू आहे. मंदिर बांधून पूर्ण कधी होणार? याची उत्सुकता भक्तांमध्ये असताना दुसरीकडे मंदिरासोबतच आता प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचीही तयारी सुरू झाली आहे. ही मूर्ती घडवण्यासाठी खास शाळीग्राम शिळा मागवण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्याप्रमाणे आता थेट नेपाळहून दोन अवाढव्य शाळीग्राम शिळा अयोध्येत आणण्यात आल्या आहेत. राम मंदिराच्या उभारणीकामी या शिळांचा वापर होणार असल्याची चर्चा असली, तरी प्रामुख्याने शाळीग्राम शिळांचा वापर मूर्ती घडवण्यासाठीच केला जाण्याचा प्रघात आहे. त्यामुळे लवकरच या शिळांमधून श्रीराम मूर्ती आकाराला येण्याची शक्यता आहे.

आज सकाळीच या दोन शिळा गोरखपूरहून अयोध्येमध्ये आणण्यात आल्या. यावेळी भक्तमंडळींनी या शिळांची मनोभावे पूजा केली आणि त्यानंतर या शिळा श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या ताब्यात दिल्या. बुधवारी या शिळा गोरखपूरमध्ये पोहोचल्या होत्या. तिथेही या शिळांची भक्तमंडळींनी पूजा कली होती.

प्रभू राम आणि जानकी यांच्या मूर्ती!

या शिळांचा वापर प्रभू श्रीराम आणि जानकी यांच्या मूर्ती घडवण्यासाठी केला जाणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. शाळीग्राम दगड हा जगभरात फक्त काली गंडकी नदीच्या किनारी भागात सापडतो. ही नदी नेपाळच्या मायगदी आणि मस्टँग जिल्ह्यातून वाहते. नेपाळमधील जनकपूर या ठिकाणी सीतामातेचं जन्मस्थान असल्याचं मानलं जातं. याच ठिकाणाहून या शिळा राम मंदिरातील मूर्ती घडवण्यासाठी मागवण्यात आल्या आहेत.

“नेपाळमध्ये काली गंडकी नावाचा एक धबधबा आहे. त्याचा उगम दामोदर कुंडातून होतो. गणेश्वर धाम गंडकीपासून उत्तरेकडे ८५ किलोमीटरवर हे कुंड आहे. या दोन्ही शिळा तिथून आणण्यात आल्या आहेत. समुद्रसपाटीपासून त्या ठिकाणाची उंची ६ हजार फुटांची आहे. हे दगड कोट्यवधी वर्षांपूर्वीचे असल्याचंही सांगितलं जातं. या दोन्ही शिळांचं वजन अनुक्रमे ३० आणि १५ टन आहे”, अशी माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी चंपत राय यांनी एएनआयशी बोलताना दिली.

धनुष्यबाणही नेपाळहूनच येणार!

दरम्यान, मूर्तीसाठी शाळीग्राम शिळांप्रमाणेच नंतर नेपाळमधील जानकी मंदिराकडूनच श्रीराम मंदिरासाठी धनुष्यबाणही पाठवलं जाणार असल्याची माहिती नेपाळ काँग्रेसचे सदस्य आणि माजी पंतप्रधान बिमलेंद्र निधी यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात राम मंदिर ट्रस्टशी चर्चा करून व्यवस्था केली जाईल, असं ते म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply