Pune Flood: पुण्याला पुन्हा जलवेढा; खडकवासलातून विसर्ग वाढवल्याने काही भाग पाण्याखाली, लष्करी पथके तैनात

Pune  : राज्यात शनिवार, रविवारी ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. २४ तासांत तीन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. पुण्यामध्येही रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहराभोवती पुन्हा जलवेढा पडला. गावांतील अंतर्गत रस्ते, पुलांवर पाणी साचले. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने ग्रामस्थांना दक्षतेचा इशारा दिला. दुसरीकडे नाशिकमध्ये दोन दिवस पावसाची कृपावृष्टी झाल्याने पाणीचिंतेने ग्रासलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यंदाच्या मोसमात गोदावरी नदी प्रथमच खळाळून वाहिली.
पुण्यातील धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात उल्लेखनीय वाढ झाली आहे. बहुतांश धरणे भरल्याने सांडव्यातून मोठ्या प्रमाणात विसर्गही करण्यात आला. खडकवासला धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे २५ जुलै रोजी पुण्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका, जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे रविवारी पुणेकरांना दिलासा मिळाला. ‘खडकवासल्या’तून ३५ हजार ‘क्युसेक’ने पाणी सोडल्यानंतर सिंहगड रस्ता परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याच्या भीतीने लष्करासह राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके (एनडीआरएफ) तैनात करण्यात आली होती.

Karjat : भीमा नदीला पूर आल्यामुळे कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना पुराचा धोका

 

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार घाटमाथ्यावरील पाऊस पाहता प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेच्या सूचना दिल्या होत्या. नदीकाठच्या रहिवाशांना शनिवारी रात्रीपासूनच अलार्म वाजवून काळजी घेण्यास सांगितले जात होते. नदीपात्रात रात्री २९ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. पाऊस वाढल्यानंतर सकाळी ११ वाजता ३५ हजार क्युसेक्सने पाणीपुरवठा करण्याची सूचना देण्यात आली. एकतानगरमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या पायदळातील जवान, बॉम्बे इंजिनीअर्स ग्रुपचे अभियंता कार्य दल आणि खडकीच्या लष्करी रुग्णालयातील वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यास सांगण्यात आले.

या तुकडीतील १०० जवान, बचाव नौका, मानवरहीत स्वयंचलित हेलिकॉप्टर (क्वाडकॉप्टर) आणि इतर आवश्यक साधनांसह हजर होते. त्यांनी पूरग्रस्त परिसरातील नागरिकांना घरे रिकामी करण्यास सांगितले. दुसरीकडे नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने शहराची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा ८० टक्क्यांवर गेला. गोदावरीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये पुरामुळे दोन जण वाहून गेले, तर जळगाव जिल्ह्यातही तीन जणांचा धरणात बुडून मृत्यू झाला. मालेगाव येथे गिरणा पात्रात मच्छिमार अडकले असून, त्यांच्या सुटकेसाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply