Pune : सुरक्षेसाठी बँक अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे, मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेकडून मारहाण झाल्यानंतर संघटनेचे पत्र

Pune : मराठी भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) बँक ऑफ महाराष्ट्रच्या (महाबँक) अधिकाऱ्यांना मारहाण केली होती. या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. बँक अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासोबत सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

संघटनेचे अध्यक्ष राजीव ताम्हाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, मराठी भाषेची सक्ती मनसेकडून केली जात असून, सार्वजनिक बँकांतील अधिकारी याचा निषेध करीत आहेत. सार्वजनिक बँकांतील अधिकाऱ्यांच्या नियुक्या या देशभरात होतात. हे अधिकारी वेगवेगळ्या भाषिक पार्श्वभूमीचे असतात. त्यांच्या नियमितपणे देशभरात बदल्या होतात. त्यामुळे प्रत्येक बँक अधिकाऱ्याने तो नियुक्त असलेल्या ठिकाणची स्थानिक भाषा शिकण्याची अपेक्षा ठेवणे अव्यवहार्य आहे.

काही गटांकडून बँक अधिकाऱ्यांना भाषेच्या मुद्द्यावर धमकावण्याचे आणि मारहाण करण्याचे प्रकार सुरू आहेत. या हल्ल्यांचा आणि सरकारी मालमत्तेच्या नुकसानीचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. यातून सर्वसामान्यांसाठी अत्यावश्यक असलेली बँकिंग सेवा विस्कळीत होत आहे. अशा प्रकारच्या गोष्टींना कोणत्याही स्थितीत खपवून घेतले जाऊ नये. अनेक सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी बँक अधिकारी परिश्रम घेतात. अनेक वेळा ते कामाच्या तासांव्यतिरिक्त जादा वेळ देऊन अथवा सुटीदिवशीही हे काम करतात. त्यामुळे त्यांना सुरक्षा देण्याची जबाबदारी सरकारची आहे, असेही संघटनेने पत्रात स्पष्ट केले आहे.

Pune : अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्यावरून महायुतीत वाद

संघटनेच्या प्रमुख मागण्या

– बँक अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

– बँक अधिकाऱ्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी स्थानिक पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत.

– अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी बँकांच्या व्यवस्थापनाने ठोस पावले उचलावीत.
बँक अधिकाऱ्यांना भाषेच्या मुद्द्यावर मारहाण करणे चुकीचे आहे. या प्रकरणी कठोर कारवाई न केल्यास आम्हाला संप करण्यासह कायदेशीर पावले उचलण्याशिवाय पर्याय राहणार नाही. या प्रकरणी मुख्यमंत्री योग्य पावले उचलतील, अशी आशा आहे. – राजीव ताम्हाणे, अध्यक्ष, बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशन



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply