Pune : गुंड गजा मारणे रडारवर, अख्ख्या टोळीवर मकोका लावणार, संपत्तीची चौकशीही होणार; पोलीस आयुक्तांचा इशारा

Pune : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपींची धिडं काढली होती. तसेच ३ आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. तसेच ज्याने मारहाण केली त्या टोळीचा प्रमुख गजा मारणे याच्यावरही कारवाई होणार आणि मकोका लावण्यात येणार, असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलंय. या प्रकरणानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असल्याचं दिसत आहे.

पत्रकार परिषद घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाई विषयी माहिती देताना सांगितलं की, 'या प्रकरणात मारहाण करणाऱ्या तिघांवर कारवाई करत त्यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे. या टोळीला नेस्तनाबूत करण्याची आमची भूमिका आहे. एकूण २७ जण आमच्या रडारवर आहेत', असं अमितेश कुमार म्हणाले.

संपत्ती जप्त

'गजा मारणे टोळीच्या संपुर्ण राज्यातील संपत्तीची माहीती घेण्याचं काम सुरु आहे. संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आरटीओकडुन त्यांच्या वाहनाची माहीती घेतली जात आहे. वाहने जप्त करणार. त्यांच्या बांधकामाची माहीती महापालिकेकडुन घेणार. त्यांची बांधकामे पाडणार, असंही अमितेश कुमार म्हणाले.

सात पिढ्यांना अद्दल घडवू

'आमच्या इथे पोलीस स्टेशनला कोणीही आका, बाका, काका येत नाही. ⁠तुम्ही गुन्हा करु नका. तुम्ही गुन्हा केलात तर, तुमच्या सात पिढ्यांना अद्दल घडेल, अशी कारवाई करू, असा इशाराही अमितेश कुमार यांनी गुंडांना दिला आहे'.

निलेश घायवळ टोळीला इशारा

'पुण्यातील काही गुंड राज्याच्या इतर भागात जाऊन विंड मिल कंपन्यांना त्रास देत आहेत. त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करणार आहोत. आता मी कोणाचे नाव घेऊ इच्छित नाही. पण आम्ही कारवाई करणार असल्याचं अमितेश कुमार म्हणालेत. नाव न घेता त्यांनी निलेश घायवळ टोळीला इशारा दिला आहे.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply