Dehradun : हिमाचल, उत्तराखंडमध्ये ढगफुटी; १६ जणांचा मृत्यू, ५० बेपत्ता

PTI , Shimla/ Mandi/ Dehradun : हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी आणि उत्तराखंडमध्ये ढगफुटीसदृश पावसाने कहर केला. यावेळी झालेल्या विविध घटनांमध्ये उत्तराखंडमध्ये १२, तर हिमाचल प्रदेशात ४ नागरिकांचा मृत्यू झाला असून ५० नागरिक बेपत्ता झाले आहेत. हिमाचल प्रदेशात अनेक घरांची पडझड झाली असून शेकडो पूल आणि रस्ते वाहून गेले.

कुलूमधील निर्मंड, सैंज आणि मलाना तर मंडीमधील पधर आणि शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे ढगफुटी झाली. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनाली-चंडीगड महामार्गावर झालेल्या भूस्खलनामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. भूस्खलन आणि बियास नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे मनाली- चंडीगड राष्ट्रीय महामार्गाचा संपर्क खंडित झाला आहे. तर मुसळधार पावसामुळे सफरचंदाच्या बागांचेही प्रचंड नुकसान झाल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री जगतसिंह नेगी यांनी दिली.

Kerala : केरळ भूस्खलन,मृतांची संख्या १७७; राहुल, प्रियंका यांच्याकडून पाहणी

उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने कहर केला. बुधवारी रात्रभर झालेल्या पावसात एकाच कुटुंबातील तीन जणांसह १२ जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. मुसळधार पावसात अनेक घरांची पडझड झाली असून पुरामुळे अनेक नद्यांचा जलस्तरसुद्धा वाढला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हरिद्वार जिल्ह्यात सहा, टिहरी येथे तीन, देहरादूनमध्ये दोन तर चमोलीत एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नैनिताल जिल्ह्यातील एक सात वर्षांचा मुलगा नदीच्या प्रवाहात वाहून गेला असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पूरग्रस्त भागात एनडीआरएफ, एसडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. राज्यातील अलकनंदा आणि मंदाकिनी या दोन प्रमुख नद्या धोकादायक पातळीवरून वाहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यात्रेकरूंना रोखले

बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे गौरीकुंड-केदारनाथ महामार्गावरून केदारनाथला जाणाऱ्या जवळपास ४५० यात्रेकरूंना रोखण्यात आले आहे. भीमबली येथे दरड कोसळल्यामुळे केदारनाथ मार्गावर अडकलेल्या २०० यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात आल्याची माहिती आपत्ती सचिव विनोद कुमार सुमन यांनी दिली.

केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्यासोबत चर्चा करून स्थितीचा आढावा घेतला तसेच केंद्रातर्फे मदतीचे आश्वासन दिले.

ड्रोनद्वारे शोध सुरू

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), भारत तिबेट सीमा पोलीस, स्थानिक पोलीस आणि होमगार्ड यांच्या पथकाने बचाव मोहीम हाती घेतली असून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जात आहे.

हेलिकॉप्टरही तैनात

अनेक यात्रेकरूंच्या मदतीसाठी हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, घोरापर्व, लिनचौली, बडी लिनचौली आणि भीमाबलीमध्ये ठिकठिकाणी दरड कोसळल्यामुळे महामार्ग ठप्प झाला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply