Police Detained Wrestlers : नव्या संसद भवनाच्या दिशेने कुस्तीपटूंचा मोर्चा, पोलिसांनी साक्षी मलिकसह इतरांना घेतलं ताब्यात

Delhi : दिल्लीतल्या जंतर-मंतर येथे सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनात गोंधळ झाला आहे. या आंदोलकांनी नवीन संसद भवनावर मोर्चा काढण्याच्या प्रयत्न केला. पोलिसांनी या आंदोलक कुस्तीपटूंना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये विनेश फोगट, साक्षी मलिक, संगीता फोगट आणि बजरंग पुनिया यांचा समावेश आहे. या कुस्तीपटुंच्या नेतृत्वाखालीच जंतर-मंतरवर आंदोलन सुरु आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अटकेची मागणी करत कुस्तीपटूंनी आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाला एक महिना झाला. ब्रिजभूषण यांना अटक करा असी मागणी हे कुस्तीपटू सातत्याने करत आहेत. ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रविवारी नवीन संसद भवनासमोर कुस्तीपटूंनी महिला महापंचायतीची घोषणा केली होती.

नव्या संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढणाऱ्या या कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलीस आणि कस्तीपटूंमध्ये वाद झाल्याचे समोर आले. ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनानंतर कुस्तीपटू आणि खाप पंचायतीने नवीन संसद भवनासमोर 'महिला पंचायत'ची हाक दिली होती. त्यासाठीच आंदोलक कुस्तीपटूंनी जंतरमंतर येथून मोर्चा काढला होता. त्यादरम्यान पोलिसांनी आंदोलनकांना अडवण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये बाचाबाची झाली.

हातात तिरंगा घेऊन नवीन संसद भवनापर्यंत पोहोचण्यासाठी कुस्तीपटूंनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेडिंग ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांशी झालेल्या चकमकीत फोगट बहिणी जमिनीवर पडल्या. एवढेच नाही तर पोलिसांनी साक्षी मलिकसह बजरंग पुनिया, विनेश फोगट यांना ताब्यात घेतले. यामुळे सध्या जंतर-मंतर परिसरामध्ये गोंधळाचे वातावरण आहे. कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या खुर्च्या, तंबू आणि इतर सामान जंतरमंतरवरून हटवण्यात येत आहे. पोलिसांनी रोखल्यानंतर कुस्तीपटू केरळ हाऊसजवळ ठिय्या मांडून बसले आहेत. येथून संसद भवन हाकेच्या अंतरावर आहे.

दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत एका महिन्याहून अधिक काळ जंतरमंतरवर उपोषणाला बसलेल्या कुस्तीपटूंमध्ये फूट पडली आहे. शनिवारी संध्याकाळी कुस्तीपटूंच्या एका गटाने आंदोलन संपविण्यास सहमती दर्शवली. तर दुसऱ्या गटाने ब्रिजभूषणला अटक होईपर्यंत कोणत्याही किमतीत आंदोलन थांबवणार नसल्याचे सांगितले. या मुद्द्यावरून शनिवारी संध्याकाळी त्यांच्यात हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply