Maharashtra Politics: मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार? ईडीच्या रडारवर असलेले नेते भाजपच्या गळाला?

NCP Maharashtra Political News : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. ईडीच्या रडावर असलेल्या काही नेत्यांना भाजप गळाला लावणार असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे. यासाठी भाजपच्या गोटात जोरदार हालचालींना सुद्धा सुरूवात झाली असल्याची माहिती आहे.

विशेष बाब म्हणजे, या नेत्यांमध्ये अजित पवार यांचा समावेश नसून हा राष्ट्रवादीचा दुसरा गट असल्याची माहिती आहे. या गटामधील ज्येष्ठ नेत्यांची एक मोठी फळी भाजपसोबत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये बहुतांश नेते हे ईडीच्या रडावरील असल्याची माहिती आहे. या नेत्यांकडून भाजपला ग्रीन सिग्नल सुद्धा दिला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.  

यामध्ये मंत्रिपदे भोगलेल्या अनेक वरिष्ठ राष्ट्रवादी चा नेत्यांचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार होणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडींमुळे राष्ट्रवादीच्या गटात अस्वस्थता पसरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार नाराज असल्याचा चर्चांना देखील उधाण आला होत. यातच आता राष्ट्रवादीचे थेट १० नेते भाजपच्या वाटेवर आहेत. यातील बहुतांश नेते हे पश्चिम महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे.

अजित पवारांनी दिला वेगवेगळ्या राजकीय चर्चांना पूर्णविराम

गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अजित पवार हे लवकरच भाजपसोबत जाणार, अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. आज या चर्चांनी अधिकच जोर धरला होता. कारण, अजित पवार यांनी आपला सासवड दौरा तातडीने रद्द केला होता. मात्र, अजित पवार यांनी वेगवेगळ्या राजकीय चर्चांना ट्विट करत पूर्णविराम दिलाय.

"मी खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याच्यावेळी झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना आणि उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजीत कार्यक्रम नव्हता, मी मुंबईतच आहे", असं अजित पवार  यांनी स्पष्ट केलंय.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *