मुंबई : दुबई, चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी करणार, राज्य कृती दलाची राज्य सरकारला सूचना

मुंबई : परदेशातून येणाऱ्या २ टक्के प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात येत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून चीन आणि दुबईमधून येणाऱ्या प्रवाशांची करोना चाचणी सकारात्मक येत आहे. या पार्श्वभूमीवर दुबई आणि चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची करोना चाचणी बंधनकारक करण्याची सूचना करोना राज्य कृती दलाने राज्य सरकारला केली आहे.

देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य सरकारना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने अलिकडेच सर्व अधिकारी आणि करोना राज्य कृती दलासोबत आढावा बैठक घेतली. परदेशात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच चीन आणि दुबईमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठ्या संख्येने करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे दुबई आणि चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्याच्या सूचना कारोना राज्य कृती दलाने राज्य सरकार आणि विमानतळ प्राधिकरणाला केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थिती लक्षात घेऊन भारत सरकारच्या सूचनेनुसार २४ डिसेंबर २०२२ पासून राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत असून २ टक्के प्रवाशांचे नमुने करोना चाचणीसाठी घेण्यात येत आहेत. यापैकी करोनाबाधित असलेला प्रत्येक नमुना जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येत आहे. ३० मार्चपर्यंत ३५ हजार ९४७ प्रवाशांची करोना चाचणी करण्यात आली असून, त्यातील ४३ नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले आहेत. या ४३ रुग्णांमध्ये पुणे येथील दहा, मुंबईतील आठ, नवी मुंबई, अमरावती, सांगली, औरंगाबाद, सातारा प्रत्येकी एक रुग्ण, तसेच गुजरातमधील पाच, उत्तर प्रदेश आणि केरळमधील प्रत्येकी तीन, तामिळनाडू, राजस्थान, ओडीसा प्रत्येकी दोन, आणि गोवा, आसाम, तेलंगाणामधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply