Mumbai : टीसीचे बनावट ओळखपत्र बनवलं; लोकलमध्ये प्रवाशांना लुटलं, शेवटी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Mumbai Local Train Fake TC Arrested: अंगात टीसीचा युनिफॉर्म, गळ्यात बनावट आयडी कार्ड, रूबाबही तेवढाच दमदार. टीसी असल्याचं सांगत तो प्रवाशांकडून अवैधरित्या दंड वसूल करायचा. पण अति तिथे माती असाच प्रकार त्याच्यासोबत घडला. प्रवाशांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. चौकशीतून हा बदमाश तोतया टीसी असल्याचे उघडकीस आले आहे. 

विजय बहादूर सिंह (२१, रा. गणेशनगर ऐरोली, नवी मुंबई. मूळ गाव जौनपूर, उत्तर प्रदेश) असे या बोगस टीसीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिवा ते डोंबिवली स्थानकांच्या दरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून विजय हा अवैधरित्या दंड वसूल करायचा.

यासंदर्भात प्रवाशांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुंबईतील मुख्य तिकीट निरीक्षक प्रमोद सरगईया यांच्याकडून विजयच्या नावाच्या टीसीची माहिती घेतली. खातरजमा केली असता, विजय सिंह नावाचा कोणताही टीसी नसल्याचे सांगण्यात आले.

Pune University : तब्बल ८० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती

यानंतर लोहमार्ग पोलिसांनी तातडीने सापळा रचत विजय सिंह याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडे टीसीचे बनावट आयडी कार्ड आढळून आले. लोहमार्ग पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याला प्रथम ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

तेथे गुन्हा नोंदविल्यानंतर घटना कोपर ते डोंबिवली स्थानकांच्या दरम्यान घडली असल्याने हा गुन्हा डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याकडे वर्ग करून पुढील चौकशीसाठी या तोतयाला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

दरम्यान, अटकेची कारवाई केल्यानंतर शुक्रवारी आरोपीला लोहमार्ग न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या बोगस टीसीने आतापर्यंत किती प्रवाशांची लूट केली? ओळखपत्र त्याने कुठून बनवून घेतले? यासंदर्भात तपास केला जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply