Mumbai : मालवणमध्ये पोलिसांवर गुंड थुंकले, शिव्या दिल्या, गृहमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, संजय राऊतांनी सुनावले

Mumbai  : सिंधुदुर्गातील मालवणमध्ये घडलेला प्रकार महाराष्ट्राच्या प्रथा परंपरेला लाज आणणारा होता. तेथे आमदार होते-खासदार होते, मी कुणाची नावे घेणार नाही. पण त्यांनी महाराष्ट्र पोलिसांना शिव्या घातल्या. पोलिसांवर थुंकले, नाही नाही ते बोलले. इतके सगळे होऊनही महाराष्ट्राचे गृहमंत्री नारायण राणे यांची पाठराखण करत होते. पोलिसांशी गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे वर्तन पाहून फडणवीस यांच्या काळजात धस्स कसे झाले नाही? असा सवाल करीत गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी शिवेसना नेते खासदार संजय राऊत यांनी केली. त्याचवेळी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बंगालच्या घटनेवर चिंता व्यक्त केली. मग महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवर, पुतळा कोसळला त्यावर का बोलत नाहीत? असा प्रश्नही राऊतांनी विचारला.

मालवणमधील शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर तेथील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महाविकास आघाडीचे नेते आणि नारायण राणे यांच्या कार्यकर्ते यांच्यात जुंपली. जवळपास तासभर दोन्ही गटात जोरदार धुमश्चक्री सुरू होती. यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मध्यस्थी करून संभाव्य वाद टाळला. दुसरीकडे माजी खासदार नीलेश राणे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेऊन पोलिसांच्या भूमिकेवर शंका उपस्थित करून त्यांना धमकावले. नीलेश राणे यांनी पोलिसांना धमकावल्याच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर आल्या. गुरुवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे यांना सुनावले.

वर्दीचा सन्मान करता येत नसेल तर गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा

मालवणमधील गुंडांनी काल पोलिसांना शिव्या दिल्या, त्यांच्यावर थुंकले, फक्त वर्दीवर हात टाकायचाच बाकी होता. एवढे सगळे होऊनही गृहमंत्री नारायण राणे यांची बाजू घेत होते. त्यांच्या बोलण्याची स्टाईलच आक्रमक आहे, असे ते सांगत होते. मग आमच्याही बोलण्याची स्टाईल आहे, आमच्यावर का गुन्हे दाखल करता? असा सवाल राऊत यांनी विचारला. तसेच पक्षातील लोक पोलिसांना धक्काबुक्की करतायेत, शिव्या घालतायेत यावर गृहमंत्री काय करतायेत? असा खडा सवालही त्यांनी विचारला. वर्दीचा सन्मान करता येत नसेल तर गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असा सल्लाही राऊत यांनी दिला.

पुतळ्याच्या नावावर हजारो कोटी रुपयांचा घोटाळा

छत्रपतींचा पुतळा कोसळल्यावर राज्य सरकारने त्याचे खापर भारतीय नौदलावर फोडायचे काम सुरू केले आहे. समुद्रात अनेक बोटी आहेत, वाऱ्याचे वेगाने त्या का उलटत नाहीत? गेट वे ऑफ इंडियाच्या समोरील शिवाजी महाराजांचा पुतळा दिमाखात उभा आहे, तो कसा कोसळला नाही? शिवाजी पार्कवर छत्रपतींचा पुतळा आहे, तो कसा पडत नाही असे सवाल करीत पुतळ्याच्या नावावर हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप राऊत यांनी केला.

नारायण राणे इतकी नरकहरामी करतील असे वाटले नव्हते

बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा सरकारी पैशातून बसवला, अशी टीका राणे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, "नारायण राणे हे इतकी नरकहरामी करतील असे वाटले नव्हते. बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे बाप आहेत. ज्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री केले, मंत्री केले, विविध पदे दिली. ज्यांनी तुम्हाला अन्नाला लावले, ज्यांनी तुम्हाला प्रतिष्ठा दिली, ज्यांनी महाराष्ट्राला अस्मिता दिली, त्यांच्याबद्दल आपण प्रश्न विचारताय. अशा प्रवृत्तीविरोधातच आम्ही जोडो मारो आंदोलन करत आहोत"

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply