Mumbai : कामा रुग्णालयात अतिविशेषोपचार युरोगायनॅक अभ्यासक्रम ऑगस्टपर्यंत सुरू होण्याची शक्यता

Mumbai : मूत्राशयासंदर्भात विविध आजारांवर योग्य उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या युरोगायनॅक या विषयावरील अतिविशेषोपचार अभ्यासक्रम कामा रुग्णालयात सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमामुळे सरकारी रुग्णालयामध्ये मूत्राशयाचा संसर्ग, लघवीची नळी, गर्भाशयासंदर्भातील शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण मिळणार आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या महिलांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळू शकतील.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या अखत्यारितील स्त्री रोग आणि प्रसूतीसाठी प्रख्यात असलेल्या कामा रुग्णालयात युरोगायनॅक म्हणजे ओटीपोटाच्या आजारावरील उपचारासाठी २०१९ पासून स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग कार्यरत आहे. महिलांमध्ये ओटीपोटाचे आजार मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने हा विभाग सुरू करण्यात आला होता. सरकारी रुग्णालयांमध्ये हे पहिले केंद्र ठरले आहे. युरोगायनॅक विभागाला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या विभागामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा मूत्ररोगतज्ज्ञ उपचार करतात. मात्र, या दोन्ही विषयांचा एकत्रित अभ्यास असलेले तज्ज्ञ या विभागामध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपलब्ध नाहीत. त्यामुळे या दोन्ही विषयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून महिला रुग्णांना उपचार मिळावेत, तसेच विद्यार्थ्यांना या विषयावरील शिक्षण सरकारी रुग्णालयामध्ये उपलब्ध व्हावे यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे एक वर्षाचा फेलोशिप अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम अतिविशेषोपचार (सुपरस्पेशालिटी) असल्याने स्त्रीरोग किंवा मूत्ररोग या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश घेता येणार आहे. या अभ्यासक्रमाचा पहिला वर्ग ऑगस्ट २०२५ पासून सुरू होण्याची शक्यता आहे.

Jejuri : आश्रमातील मुलांना त्वरित आधार कार्ड मिळणे गरजेचे; न्यायाधीश अभय ओक

रुग्णांबरोबरच विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबईतील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हा अभ्यासक्रम शिकविला जात नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयत प्रवेश घ्यावा लागतो. त्यामुळे त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. मात्र कामा रुग्णालयामध्ये युरोगायनॅक हा अभ्यासक्रम ऑगस्टमध्ये सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच कामा रुग्णालयातील युरोगायनॅक विभागातील रुग्णांनाही अतिविशेषोपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी माहिती कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.

सहा वर्षांत ३,१९० रुग्णांवर उपचार

कामा रुग्णालयातील यूरोगायनॅक बाह्यरुग्ण विभागांतर्गत २०१९ ते २९२४ या सहा वर्षांच्या कालावधीत एकूण ३,१९० रुग्णांवर उपचार करण्यात आले. यातील ७०४ रुग्णांवर मूत्राशय सिंचन ही प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये निर्जंतूकीकरण केलेल्या द्रवाने मूत्राशय स्वच्छ केले जाते. मागील काही दिवसांपासून महिलांमध्ये या समस्येचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या नव्या अभ्यासक्रमामुळे तज्ज्ञ डॉक्टरांकडून महिलांना अधिक चांगले उपचार मिळू शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply