Maratha Reservation: "सरकार इतकं नालायक असू शकतं का?" मनोज जरांगे पाटील यांची टीका

अंतरवाली सराटी: मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला निघण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते भावूकही झाले तसंच आक्रमही झाल्याचं पाहण्यास मिळाले. प्राण गेला तरीही आता मागे हटणार नाही. मराठा समाजाने सरकारला सात महिने वेळ दिला आहे. तरीही आरक्षण मिळालेलं नाही, त्यामुळे मुंबईला गेल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सात दिवसांमध्ये आम्ही मुंबईला पोहचणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठ्यांची एकजूट मोडू नका :

माझं शरीर मला उपोषणामुळे साथ देत नाहीये. पण मी असो किंवा नसो मराठ्यांची एकजूट मोडू नका. आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आमचं आंदोलन मुंबईत पोहचल्यावर कोट्यवधी मराठे मुंबईत दिसणार आहेत. राज्यभर आम्ही आमच्या तालुक्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये लढणार आहोत. ही आरपारची लढाई आहे कुणी घरी राहू नका अशी माझी मराठा बांधवांना विनंती आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सरकारशी काहीही चर्चा झालेली नाही. आमचं म्हणणं सरकारला माहीत आहे. चर्चा किती दिवस करणार? सरकार मराठ्यांना वेठीस धरणार असेल आणि तर आम्ही आजपासूनच उपोषण करत मुंबईला जाणार असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. याबाबत माझ्या समाजाशी बोलून याबाबत निर्णय घेणार आहे. आम्ही सामंज्यसाची भूमिका घेतल्यानेच आम्ही सात महिने वेळ दिला आहे.

सरकारला झोप कशी येते? :

आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. या आंदोलनात शेकडो मराठे शहीद झाले आहेत. अनेक माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं आहे. अनेक घरांमधला कर्ता पुरुष गेला आहे. परंतु त्यानंतर सरकारने आरक्षण दिले नाही. आपली मुले मरत असताना सरकारला झोप कशी येते? सरकार इतके नालायक असू शकते का? सरकार निर्दयी आहे. निष्ठूर आहे. मराठा समाजाबद्दल हा सर्व विचार करताना मला रात्ररात्र झोप येत नाही. यामुळे आता आरपारची लढाई करण्याचा निर्णय मी घेतला आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

सरकार इतकं नालायक कसं काय असू शकतं? :

५४ लाख नोंदी मिळाल्या आहेत. ४५ वर्षांपासून लढा सुरु आहे. सरकार इतकं निर्दयीपणे कसं वागू शकतं. ज्या सरकारला मराठ्यांनी गादीवर बसवलं, आज नोंदी मिळालेल्या असताना आरक्षण देऊ शकत नाही? गोरगरीबांची पोरं मरत असताना त्यांना हक्काचं आरक्षण का देत नाही? हा अन्यायाचा कळस झाला आहे. डोळ्यांदेखत आत्महत्या होत आहेत तरीही सरकारला झोप कशी लागते? मुंबईत काहीही झालं तरीही हरकत नाही आम्ही मागे फिरणार नाही. पैठणचा एक मराठा बांधव याचा मुलगा तीन महिन्यापूर्वी गेला. तरीही त्याने मला येऊन सांगितलं माझा मुलगा गेला असला तरीही आपण मराठा आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसायचं नाही. सरकार इतकं नालायक असू शकतं का? पोरांचे बळी जाऊनही ते हक्काचं आरक्षण देत नाही? असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे.

आता मी शहीद झालो तरी माघार नाही. माझ्या छातीवर गोळ्या पडल्या तरी मागे हटणार नाही. मराठयांसाठी टोकाचे पाऊल उचलणार आहे. सरकारच्या दारात मरण आले तरी आता माघार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply