Maharashtra Weather : थंडीने गारठलेल्या महाराष्ट्राला दिलासा; पुढील आठवड्यात गारठा कमी होणार, IMDचा अंदाज

Mumbai :  राज्यभरात थंडीचा कडाका जाणवत असून नाताळच्या सुमारास हे प्रमाण कमी होईल, अशी शक्यता आहे. मुंबईमध्ये किमान तापमानाचा पारा रविवारी शनिवारपेक्षा थोडा वर होता. हा पारा सोमवारी आणखी वाढून दोन ते तीन दिवसांनी स्थिर राहण्याचा अंदाज आहे.

मुंबईत तापमानाचा पारा वाढला, उष्णता वाढणार

राज्यात दोन ते तीन दिवस शनिवार आणि रविवारी नोंदल्या गेलेल्या किमान तापमानापेक्षा चढे तापमान असू शकेल. दुपारीही निरभ्र आकाशामुळे सूर्यकिरणे थेट जमिनीवर पोहोचून कमाल तापमानाचाही चटका जाणवण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये सांताक्रूझ येथे 17.4, तर कुलाबा येथे 20.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. रविवारी आणि सोमवारीही उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट जाणवू शकते. याचा परिणाम उत्तर कोकणावर होतो.

नाशिकचा पारा 9.2 अंशांवर

नाशिक शहरातील किमान तापमानात 24 तासांमध्ये 2.3 अंश सेल्सियसने वाढ झाली आहे. शनिवारी 7 अंश सेल्सियसच्या खाली घसरलेले किमान तापमान रविवारी सकाळी 9.2 अंश सेल्सियस नोंदवले गेले. त्यामुळे थंडीचा कडाका काहीसा कमी झाल्याचा प्रत्यय येत आहे

थंडीच्या कडाक्याने रब्बी पिकांना फटका

नाशिकमध्ये गुरूवारी किमान तापमान 9.8 अंश सेल्सियस नोंदवले गेले होते. ते कमी होत 6.9 अंश सेल्सियस झाले. परंतु, हेच तापमान आता पुन्हा वाढू लागले आहे. राज्यासोबतच जिल्ह्यात वाढलेल्या थंडीच्या कडाक्याने रब्बी हंगामातील पिकांसोबतच फळबागांनाही फटका बसू लागला आहे.

संभाजीनगरमध्ये पारा घसरला

छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात कडाक्याची थंडी जाणवत आहे. शहरात शनिवारी किमान 11 आणि कमाल 31 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. येत्या आठवड्यातही थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मागील दहा दिवसांपासून मराठवाड्यात थंडीत वाढ झाली आहे. उत्तर भारतात थंडीची लाट आल्यानंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी वाढली आहे. विशेषत: सायंकाळनंतर बोचरी थंडी जाणवत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *