King Charles III : लंडनमध्ये राज्याभिषेकात भारतीय सैनिकांचा सहभाग, व्हिक्टोरिया राणीपासून आहे परंपरा

लंडन : राजे चार्ल्स तिसरे यांच्या राज्यारोहणाबाबत ब्रिटनमधील भारतीयांमध्येही उत्सुकता व्यक्त होत असून पंतप्रधानपदावर भारतीय वंशाचेच ऋषी सूनक विराजमान असल्याने या भव्य समारोहामध्ये भारतीय वंशियांचा सहभाग दिसणार आहे.

मात्र, भारतात ब्रिटिशराज असल्यापासून राजसत्तेच्या कार्यक्रमांमध्ये भारतीयांचा सहभाग असल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे. ही पद्धत व्हिक्टोरिया राणीने सुरु केली असून राजघराण्याने आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांना राणीच्या सुरक्षा रक्षकांमध्ये भारतीय सैनिकांचा समावेश असायचा, असे इतिहासकार-लेखिका शर्बानी बसू यांनी सांगितले.

व्हिक्टोरिया या १८३७ ते १९०१ या कालावधीत ब्रिटनच्या राणी होत्या. बकिंगहॅम पॅलेस या महालाला आपले निवासस्थान बनविणाऱ्या त्या पहिल्या सम्राज्ञी होत्या. याच बकिंगहॅम पॅलेसमधून (ता. ६) राजे चार्ल्स आणि त्यांच्या पत्नी कॅमिला यांची राजबग्गी राज्यारोहण सोहळा होणाऱ्या वेस्टमिन्स्टर ॲबेच्या दिशेने जाणार आहे. या समारोहात ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या अनेक भारतीय वंशाच्या नागरिकांना निमंत्रण आहे.

मात्र, राजघराण्याने आयोजित केलेल्या समारंभांमध्ये राणी व्हिक्टोरियाच्या काळापासून भारतीयांचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. ‘व्हिक्टोरिया अँड अब्दुल’ या पुस्तकाच्या लेखिका शर्बानी बसू यांच्या माहितीनुसार, व्हिक्टोरिया राणीला भारताबद्दल विशेष प्रेम होते. राणीने भारताला कधीही भेट दिली नसली तरी निकटचा सहकारी अब्दुल करीम याच्यामुळे त्यांना भारताबद्दल विविध माहिती मिळत होती.

राणी व्हिक्टोरिया यांना भारताबद्दल विशेष प्रेम असल्याने बकिंगहॅम पॅलेस ते वेस्टमिन्स्टर ॲबे या दरम्यान निघणाऱ्या प्रत्येक मिरवणुकीत राणीच्या रक्षक दलांमध्ये भारतीय सैनिकांचेही दल निश्‍चित असायचे.

आता परिस्थिती बदलली असली तरी राजघराण्याच्या सोहळ्यांशी भारतीयांच्या संबंधांचा दुवा दोनशे वर्षांनंतरही कायम असल्याचे बसू यांचे म्हणणे आहे. (ता. ६) होणाऱ्या राज्यारोहण समारोहात ब्रिटिश एम्पायर मेडल मिळालेल्या भारतीय वंशाच्या शेफ मंजू माल्ही यांच्यासह अनेक भारतीय वंशाचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply