Khandoba Gad : तब्बल 13 दिवसांनंतर जेजुरी ग्रामस्थांचं आंदोलन स्थगित; खंडोबा गडावर कशासाठी सुरु होतं उपोषण?

जेजुरी : खंडोबा गडाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री. मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्त मंडळामध्ये आणखी चार विश्वस्त वाढविण्याच्या सूचना दिल्याने स्थानिकांना न्याय मिळणार आहे. त्यामुळे गेले तेरा दिवस सुरु असलेले उपोषण आंदोलन बुधवारी स्थगित करण्यात आलं.

जेजुरीकरांनी भंडारा उधळून या निर्णयाचं स्वागत केलं. देवसंस्थानचे नवनियुक्त मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे, विश्वस्त मंगेश घोणे, अभिजित देवकाते, डॉ. राजेंद्र खेडेकर, ॲड. गोविदं पानसे, अनिल सौदडे, ॲड. पांडुरंग थोरवे या नवनियुक्त विश्वस्तांनी श्री. मार्तंड देवसंस्थानचे चार विश्वस्त वाढविण्याचा ठराव करून तातडीने धर्मादाय आयुक्त कार्यालयाला पाठविणार असल्याचे ग्रामस्थांसमोर जाहीर केलं.

त्यानंतर जेजुरीकरांनी भंडारा उधळून स्वागत केलं. विश्वस्तपदाच्या निवड मागील महिन्यात झाल्यानंतर त्यामध्ये स्थानिकांवर अन्याय झाल्याची भावना ग्रामस्थांच्यामध्ये होती. त्यासाठी त्यांनी आंदोलनाचा मार्ग निवडत निषेध नोंदविला. सलग तेरा दिवस आंदोलन सुरु होतं. ग्रामस्थांच्या वतीने सह धर्मादाय आयुक्त यांच्याकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. त्याची बुधवारी सुनावणी होती.

दरम्यान, नवनिर्वाचित विश्वस्त बुधवारी सायंकाळी जेजुरीत आले. ग्रामस्थांच्या समोर त्यांना दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करण्याचे जाहीर केले. ग्रामस्थांनी भंडारा उधळून या निर्णयाचे स्वागत केले. चार नवीन विश्वस्त वाढविण्याचा ठराव आजच घ्यावा व तातडीने कार्यवाही सुरु करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. नवीन चार विश्वस्तांची निवड झाल्यास विश्वस्त मंडळ अकरा सदस्यांचे असणार आहे.

या शिवाय नगराध्यक्ष व तहसीलदार हे पदसिद्ध सदस्य असतात. त्यामुळे विश्वस्त मंडळ १३ सदस्यांचे होणार आहे. नवीन चार विश्वस्त वाढविण्याच्या निर्णयामुळे स्थानिकांना न्याय मिळेल, अशी ग्रामस्थांची भावना आहे. विश्वस्तांचा निर्णय ऐकण्यासाठी देवसंस्थानच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने नागरिक जमा होते. तुर्तास तरी जेजुरीकरांचे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे यावेळी जालिंदर खोमणे यांनी सांगितले. माजी विश्वस्त संदीप जगताप यांनी आभार मानले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply