Gram Panchayat Election : मांडवगण फराटा ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा

मांडवगण फराटा : शिरूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मांडवगण फराटा ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला. येथे सत्ता परिवर्तन झाले असून राष्ट्रवादीच्या ताब्यातील असलेली सत्ता खेचून आणण्यात भाजपला यश आले आहे. या निवडणुकीत भाजपचे दादा पाटील फराटे यांच्या पॅनेलने थेट सरपंचपद तसेच ११ विरुद्ध ६ अशा फरकाने दणदणीत विजय संपादन केला. दादा पाटील फराटे यांच्या सूनबाई समीक्षा मदन कुरुमकर (फराटे) यांची थेट जनतेतून सरपंचपदी वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत सपशेल हार मानावी लागली असून आमदार अशोक पवार यांना यामुळे मोठा धक्का बसल्याचे मानला जात आहे. मांडवगण फराटा ही शिरूर तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या ग्रामपंचायत मध्ये सदस्य पदासाठी १७ व थेट सरपंच पदासाठी अशा एकूण अठरा जागांसाठी निवडणूक पार पडली.

शिरूर तहसील कार्यालयात सकाळी साडेदहाच्या सुमारास मतमोजणी केंद्रावर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. या वेळी दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात आली. यात समीक्षा फराटे कुरुमकर या थेट सरपंच पदाच्या उमेदवार पहिल्या पासून आघाडीवर होत्या. दुसऱ्या फेरीत त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सरपंच पद हे इतर मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित असल्याने प्रथमच महिलांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती. थेट सरपंच पदासाठी घोडगंगाचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, घोडगंगाचे संचालक सुधीर फराटे इनामदार यांच्या नेतृत्वाखालील शिवशक्ती ग्रामविकास पॅनल कडून समीक्षा अक्षय फराटे कुरुमकर तर श्री वाघेश्वर ग्रामविकास आघाडी पॅनल कडून शीतल सचिन जगताप यांच्यामध्ये सरळ लढत झाली होती. दादा पाटील फराटे, सुधीर फराटे इनामदार यांनी प्रचाराची धुरा सांभाळत पॅनल ची बांधणी केली होती. सत्ताधारी पॅनल च्या उमेदवाराचा अक्षरशः धुव्वा उडाला असून किशोर फराटे, माजी उपसरपंच सुभाष फराटे या मातब्बर उमेदवाराना पराभवाचा सामना करावा लागला. निकालानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

तालुक्यातील मांडवगण फराटा ही सर्वात मोठी ग्रामपंचायत मानली जाते. यापुर्वी भाजपचे दादा पाटील फराटे व शिवसेनेचे सुधीर फराटे यांनी गावच्या सोसायटीवर विजय मिळवला होता. त्याचप्रमाणे पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये एकहाती सत्ता प्रस्थापित केल्याने स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पिछेहाट झाली आहे. यामुळे आगामी जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर हा विजय महत्वाचा मानला जात आहे. घोडगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीतही मांडवगण, इनामगाव आणि वडगाव रासाई गटात मतदारांनी अशोक पवारांपेक्षा दादा पाटील फराटे यांना जास्त मताधिक्य दिले होते. तसेच आताही ग्रामपंचायत निवडणुकीत दादा पाटील फराटे यांच्या पॅनलला बहुमत देऊन मतदारांनी दादा पाटील फराटे आणि सुधीर फराटे यांच्या नेतृत्वाला साथ दिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply