CM Eknath Shinde : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी CM शिंदेंची मोठी खेळी; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार?

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरूवात केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना धक्का देण्यासाठी नवी चाल खेळली आहे. विधान परिषदेत शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उप सभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र दिलं आहे. 

या पत्रात शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची प्रतोद पदी निवड करण्याचा ठराव झाल्याचं सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी शिंदेंकडून पहिला वार करण्यात आल्याचं बोललं जातंय. दरम्यान, विधान परिषदेत ठाकरे गटाचं बहुमत असल्यामुळे प्रतोद नियुक्ती करून ताबा मिळवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असला तरी बहुमतापुढे काही होणार नाही, असा ठाकरे गटाने ठाम सांगितलं आहे.

विधानसभेपाठोपाठ आता एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेतही शिवसेना पक्षावर अधिकार सांगण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी आणखी धोक्याची घंटा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रतोद नेमल्यानंतर शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका घेण्याचा शिंदे यांचा मार्ग मोकळा होणार आहे.

दुसरीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात अविश्वास ठराव आणण्याची ठाकरे गटाकडून तयारी करण्यात आली आहे. विधान परिषदेत महाविकास आघाडीचे संख्याबळ अधिक असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचा आरोप करत देशद्रोही म्हटलं होतं.

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना देशद्रोही म्हटल्याने विरोधक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, मुख्यमंत्र्यांचा जाहिरातींवर आणि वर्षा निवासस्थानातील चहापाणावरील वारेमाप खर्च, जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटप यावरून शिंदे गटातील आमदारांची चाललेली मनमानी अशा वेगवेगळ्या विषयांवरून विरोधक सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply