Bihar Train Accident : बिहारच्या बक्सरमध्ये नॉर्थ इस्ट एक्स्प्रेसचे २० डबे रुळावरुन घसरले, चार जणांचा मृत्यू तर ८० हून अधिक प्रवासी जखमी

Bihar Train Accident Today : बिहारमधल्या बक्सर भागात नॉर्थ इस्ट एक्स्प्रेस रुळावरुन घसरल्याने अपघात झाला. टूरीगंजे ते रघुनाथपूर दरम्यान हा अपघात झाला. या ठिकाणी आता मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला, ८० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना पाटणा येथील आयजीआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही ट्रेन दिल्लीहून कामाख्या या ठिकाणी चालली होती. या ट्रेनचे २० डबे रुळावरुन घसरले आहेत.

ज्या ठिकाणी रेल्वेचे डबे घसरले तिथे मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. NDRF, SDRF, जिल्हा प्रशासन, रेल्वे अधिकारी यांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. २३ डब्यांची ही ट्रेन सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी दिल्लीतल्या आनंद विहार टर्मिनलहून रवाना झाली होती. रघुनाथपूर स्टेशनजवळ हा अपघात रात्रीच्या सुमारास झाला. अपघात झाल्यानंतर तातडीने या ठिकाणी रुग्णवाहिका, डॉक्टर्स हे सगळं पाठवण्यात आलं.

आनंद विहार येथून धावणारी ट्रेन क्रमांक 12506 डाउन ईशान्य एक्स्प्रेस बिहारमधील बक्सर आणि आराह स्थानकांदरम्यान रघुनाथपूर स्थानकाजवळ रुळावरून घसरली. अपघातात रेल्वेचे २० डबे रुळावरुन घसरले आहेत.

ट्रेनमधून प्रवास करणार्‍या काही प्रवाशांनी त्यांची आपबिती सांगितली. मोहम्मद नासिर नावाच्या प्रवाशानं सांगितलं की, आम्ही दोघेजण होतो. B7 बोगीत होतो. आम्ही जेवून झोपलेलो. काही कळण्यापूर्वीच अपघात घडला. सगळं क्षणार्धात घडलं. काहीच कळालं नाही.बोगीमध्ये किती लोक होते? हे सांगणं कठीण आहे. रेल्वेच्या डब्यातून अनेक प्रवासी प्रवास करत होते. माझ्याबरोबर माझे सहप्रवासी असलेल्या अबू जैद यांचा अपघातात मृत्यू झाला आहे असंही नासिर यांनी सांगितलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply