अकोला हिंसाचार प्रकरणानंतर पोलिसांकडून धरपकड सुरू, आतापर्यंत दीडशेहून अधिक आरोपींना अटक

Akola Violence : जुने शहरात 12 मे रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या हिंसाचाराच्या घटनेने शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. दोन गटात झालेल्या वादात जमावाकडून दगडफेक, जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी अटकसत्र सुरु केले असून आतापर्यंत दीडशेहून अधिक आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील अर्ध्याहून अधिक आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह संदेशावरून 12 मे रोजी रात्री दोन गटांत दगडफेक, जाळपोळीची घटना घडली होती. याप्रकरणात जुने शहर व रामदास पेठ पोलिसांनी ३०० हून अधिक समाजकंटकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी १५० हून अधिक आरोपींना अटक केली आहे.

जमावबंदी उल्लंघन प्रकरणी 32 जणांविरुद्ध गुन्हे दाखल

जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिवसा जमावबंदी असताना आदेशाचे उल्लंघन करून महिलांनी मोर्चा काढला होता. त्यामुळे दोन्ही गटांतील 32 जणांविरुद्ध जुने शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. संवेदनशील भागाची पाहणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. यावेळी हरिहरपेठच्या बाजूला असलेल्या गल्लीमध्ये आवारभिंत बांधण्याची मागणी एका गटाने केली होती. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी या ठिकाणी भिंत उभारण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार महापालिकेच्या वतीने भिंत उभारण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्यानंतर दोन्ही गटांतील महिलांचा मोठा जमाव या ठिकाणी गोळा झाला आणि त्यांनी भिंत उभारण्यास विरोध केला. यावेळी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन्ही गटांतील महिला व पुरुषांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांचे कठोर कारवाईचे निर्देश

अकोल्यानंतर अहमदनगरच्या शेवगावात देखील दोन गंटात हिंसाचार झाला होता. शेवगावमध्येही दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सामाजिक सलोखा राखला जाईल, कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घेऊन जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply