“संजय राऊतांना भीती वाटायला लागलीय की अंधारेताई आपली जागा तर घेत नाहीत ना? ”; सुषमा अंधारेंवरुन शिंदे गटाचा टोला

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शिवसेनेत पडलेली उभी फूट अन् त्यानंतर घडलेल्या सत्तानाट्यामधून सत्तेत आलेल्या शिंदे सरकारविरोधात महाविकास आघाडीतील पक्षांकडून सातत्याने टीका होताना दिसत आहे. सत्ताधारी शिंदे गट व भाजपा विरुद्ध उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रोज झाडल्या जात आहेत. अशातच उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारेही चांगल्याच चर्चेत आहेत. आपल्या भाषणांमधील टोलेबाजीमुळे अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या अंधारे यांच्या भाषण कौशल्याचं कौतुक होत असतानाच आता त्यांच्या भाषणांमधून टीकेचा भडीमार होत असणाऱ्या शिंदे गटानेच अंधारेंची खासदार संजय राऊत यांना भीती वाटू लागली आहे, असं विधान केलं आहे.

आपल्या खास शैलीमध्ये शिंदे गटापासून ते अगदी भारतीय जनता पार्टीपर्यंत सर्वांचाच समाचार घेणाऱ्या अंधारे यांचं दसरा मेळाव्यातील भाषणही चांगलेच गाजले होते. त्यानंतर सध्या राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरु असलेल्या ‘महाप्रबोधन यात्रे’दरम्यानच्या कार्यक्रमांमध्येही अंधारे यांच्या भाषणांची विशेष चर्चा आहे. उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या म्हणून त्या अनेक वृत्तवाहिन्यांशीही संवाद साधताना दिसत आहेत. असं असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरे समर्थक खासदार संजय राऊत हे मागील महिन्याभराहून अधिक काळापासून पत्रा चाळ प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे ईडीच्या कोठडीत आहेत. सध्या संजय राऊत हे आर्थर रोड तुरुंगामध्ये कैद असून त्यांचा कोठडीतील मुक्काम हा २९ ऑक्टोबरपर्यंत वाढला आहे.

मात्र नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान संजय राऊत यांनी न्यायालयाबाहेर भाजपाचे नेते एकनाथ खडसेंची काही मिनिटांसाठी भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली. तसेच प्रसारमाध्यमांशी केलेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान अंधेरीमधील पोटनिवडणुकीमध्ये भाजपाने उमेदवार मागे घेतल्यानंतर राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी उमेदवार मागे घेण्यासाठी लिहिलेलं पत्र हे स्क्रीप्टचा भाग होता असा टोला लगावला.

याच सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांची तुलना करत टोलेबाजी केली आहे. प्रसारमाध्यमांशी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये म्हात्रे यांनी, “संजय राऊत यांना भिती वाटायला लागलीय की अंधारेताई आपली जागा तर घेत नाहीत ना?
म्हणून आता अंधार कोठडीतूनसुद्धा ते आता प्रसारमाध्यमांशी बोलत आहेत,” असा टोला लगावला आहे. तसेच, संजय राऊत हे “कसं बोलत आहेत, काय बोलत आहेत याची आम्हाला कल्पना नाही. पण हे सारं हस्यास्पद नक्कीच वाटत आहे,” असंही म्हात्रे यांनी म्हटलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply