संजय राऊतांच्या घरात आढळलेली रक्कम कोणाची? भाऊ सुनील राऊत यांचा मोठा खुलासा, ५० लाखाच्या व्यवहाराबाबतही दिलं स्पष्टीकरण

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर राज्यभरातून शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. शिवसेनेसह महाविकासआघाडीच्या नेत्यांनीही राऊतांवर केलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. दरम्यान, शिवसेना नेते सुनील राऊत यांनी देखील ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधित कारवाई बोगस असल्याचं म्हटलं आहे. तसेच पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांचा काडीमात्र संबंध नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ते माध्यमांशी संवाद साधत होते.

संजय राऊत यांच्या घरात आढळलेल्या साडेअकरा लाख रुपयांतील १० लाखाच्या पाकिटावर आयोध्या आणि एकनाथ शिंदे असं लिहिल्याची माहितीही सुनील राऊत यांनी दिली. संबंधित रक्कम शिवसेना नेत्यांच्या आयोध्या दौऱ्यातील उरलेली रक्कम असून ती पक्षाकडे जमा करण्यासाठी ठेवण्यात आली होती, असा दावा सुनील राऊत यांनी केला आहे. तसेच पत्राचाळ घोटाळा प्रकरण बोगस असून संजय राऊतांचा याच्याशी काहीही संबंध नाही. पत्राचाळ नेमकी कुठे आहे? हेही संजय राऊतांना माहीत नाही. संजय राऊतांना अटक करण्यासाठी हे पत्राचाळ प्रकरण उकरून काढण्यात आलं आहे, असा आरोप सुनील राऊत यांनी केला आहे.

संजय राऊतांच्या बँक खात्यात ५० लाख रुपयांच्या एन्ट्रीबाबतही सुनील राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. संबंधित रक्कम प्रवीण राऊत यांच्या पत्नीने ट्रान्सफर केले होते. हे पैसे रिफंडेबल आहेत. दादरच्या फ्लॅटसाठी घेतलेलं ते कर्ज होतं. त्यामुळे पैसे घ्यायचेच असते तर आम्ही रोकडमध्ये (कॅशमध्ये) घेतले असते. पण ही रक्कम चेकद्वारे घेण्यात आलेली आहे. सपना पाटकर यांनी दाखल केलेली तक्रारदेखील बोगस आहे. संजय राऊतांना अडकवण्यासाठी हे सर्व किरीट सोमय्या गँगचं कारस्थान आहे, असा आरोपही सुनील राऊत यांनी केला आहे.

“सपना पाटकर इतक्या दिवस झोपल्या होत्या का? संबंधित संपत्ती बेनामी आहे, हे काल-परवाच त्यांना कसं आठवलं? संजय राऊतांना अडकवण्यासाठी हा आखलेला गेम आहे, ही सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. भारतीय जनता पार्टीला एकटे संजय राऊत भारी पडले, त्यामुळे त्यांना तुरुंगात टाकून शिवसेना संपवायची, हे भाजपाचं कटकारस्थान आहे. पण शिवसेनेचा आवाज दबणार नाही. शिवसेनेचा आवाज संपणार नाही, संजय राऊत झुकणार नाहीत. कितीही चुकीची कारवाई केली तरी संजय राऊत शेवटपर्यंत शिवसेना सोडणार नाहीत” असंही सुनील राऊत म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply