“राज्यात एक गट बारा भानगडींचा मॅटिनी शो सुरू झाला असून त्याची…”; मंत्रीमंडळ विस्तारावरुन शिवसेनेचा शिंदे गटाला टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारानंतरच नाराजी नाट्य सुरु असतानाच आता शिवसेनेनं या मुद्द्यावरुन एकनाथ शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. शिंदे गटातील प्रत्येकाला मंत्रीपद हवं आहे त्यामुळे हे खातेवाटप म्हणजे बारा भानगडी असल्याचा टोला शिवसेनेनं लगावला आहे. कोणतीही भानगड खपवून घेतली जाणार नाही, हे शिंदेंनी आमदारांना सांगणे हा विरोधाभास आहे असा शाब्दिक चिमटाही शिवसेनेनं काढला आहे. संपूर्ण शिंदे गटाची निर्मितीच भानगडीतून झाली असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. सध्याच्या भानगडी पाहता शिंदे गटाने स्वाभिमान आणि हिंदुत्वासाठी पक्ष सोडल्याचे दावे खोटे असल्याचा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

“महाराष्ट्राच्या नशिबी जे भोग सध्या आले आहेत त्यातून मार्ग कसा काढावा याच विवंचनेत मऱ्हाटी जनता आहे. ‘ईडी-पिडी’ बळाचा वापर करून राज्याच्या मानेवर चाळीस पिंपळांवरचा मुंजा बसविला. त्यामुळे सकाळी उठून पाहावे तर राज्यात एक नवी भानगड झालेली दिसते. यापैकी एकाही भानगडीशी शिवसेनेचा संबंध नाही. ३८ दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तारले आणि त्यानंतर खातेवाटपही रडतखडत झाले. लोकांनी प्रश्न विचारल्यावर त्यांना नाइलाजाने खातेवाटप जाहीर करावे लागले. खातेवाटपही अगदी नमुनेदार झाल्याने शिंदे गटात त्यावरूनही एखाद्या भानगडीची ठिणगी न पडली तरच नवल,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply