राऊतांच्या घरी सापडलेल्या नोटांवर ‘एकनाथ शिंदें’चं नाव, शिंदे गटाने दिली प्रतिक्रिया, म्हणाले “आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा…”

शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रात्री उशिरा त्यांना अटक केली. पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, ईडीने कारवाई करताना संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी छापा टाकून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली. यातील १० लाखांच्या रकमेवर एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख केल्याची माहिती समोर येत आहे. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ बंगल्यावर सकाळी सातच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी अधिकारी दाखल झाले. सुमारे दहा अधिकाऱ्यांच्या या पथकाबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआयपीएफ) जवानही तैनात करण्यात आले होते. शिवाय दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतही येथेही ‘ईडी’कडून शोधमोहीम राबवण्यात आली. नऊ तास सुरु असणाऱ्या या चौकशी आणि छापेमारीदरम्यान राऊत यांच्या घरी साडेअकरा लाखांची रोख रक्कम सापडली. यामधील १० लाखांची रक्कम असणाऱ्या पाकिटावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असून ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख असल्याची माहिती आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “एकनाथ शिंदेंच्या विरोधात काही करायचं असेल आणि त्यासाठी अयोध्येला जायचं असल्याने ते पैसे राखीव ठेवले असल्याची शक्यता आहे. प्रत्येक पैशाचा स्त्रोत दाखवावा लागतो आणि तो संजय राऊतांकडे असणार. ते हुशार, बुद्धिमान असून मुद्दाम असं काही लिहिणार नाहीत. एकनाथ शिंदेंचा याच्याशी काही संबंध नाही”.

“आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा आमदारांना पैसे दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावर आम्ही त्यांना आमची घरं तपासून पाहा, पैसै सापडणार नाहीत असं आवाहन केलं होतं. कारण हा पैशांसाठी केलेला उठाव नव्हता,” असं केसरकर म्हणाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *