“मुंबईवर हल्ला करण्याची कोणी हिंमत करणार नाही,” धमकीच्या ‘त्या’ संदेशानंतर एकनाथ शिंदे म्हणाले तपास सुरू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (२० ऑगस्ट) सहकुटंब भीमाशंकर येथे जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भगवान शंकराकडे काहीही मागावे लागत नाही. काय घ्यायचे आणि काय द्यायचे हे शंकराला माहिती असते. राज्यातील कष्टकरी, बळीराजा, सुखी राहू देत असे साकडे मी घातले आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच मुंबईवर कोणीही हल्ला करण्याची हिंमत करणार नाही. यंत्रणांकडून तपास सुरू आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली. भगवान शंकराचे दर्शन घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. यावर शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “धमकी देणारे काही संदेश आले आहेत. त्याचा तपास सुरू आहे. आयबी, रॉ, केंद्रीय यंत्रणा तपास करत आहेत. मुंबईवर कुठलेही संकट येणार नाही. पूर्ण बंदोबस्त करण्यात आला आहे,” असे म्हणत त्यांनी गृहविभाग, मुंबई पोलीस सक्षम आहेत. कोणीही कुठलाही हल्ला करण्याची हिंमत करणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

“दरवर्षीप्रमाणे आम्ही भीमाशंकर येथे दर्शनासाठी आलो आहोत. आम्ही भक्तीभावाने पूजा केली आहे. भगवान शंकराकडे काही मागावे लागत नाही. काय घ्यायचे, काय द्यायचे त्याला हे सर्व माहिती असते. भिमाशंकराकडे एवढंच मागणं मागितलं की, राज्यातील बळीराजा, शेतकरी, कष्टकरी, सर्व समाज, कामगार हे सुखी राहो. त्यांना सुगीचे दिवस येवोत, महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम होवो, राज्यावरील संकट दूर होऊ दे, असे साकडे मी घातले आहे,” असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हे सरकार कधीही कोसळू शकते. एकनाथ शिंदे कमी दिवसाचे मुख्यमंत्री आहेत, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. यावदेखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. “मी त्यांना कामातून उत्तर देईन. आम्हाला राज्यातील जनतेला सुखी, समाधानी ठेवायचे आहे,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply