भारतात रंगणार जगातील सर्वात मोठी बुद्धिबळ स्पर्धा; दोन हजार २०० खेळाडू घेणार सहभाग

बुद्धिबळ हा प्राचीन काळापासून खेळला जाणारा क्रीडा प्रकार आहे. भारतामध्येदेखील या खेळाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अशा या खेळासाठी भारत लवकरच कोट्यवधी रुपये खर्च करणार आहे. २८ जुलैपासून भारताच्या ‘चेस कॅपीटल’ म्हणजेच तामिळनाडू येथे ४४व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडचे आयोजन केले जाणार आहे. ही जगातील सर्वात मोठी बुद्धिबळ स्पर्धा म्हणून ओळखली जाते. तब्बल ९८ वर्षांनंतर भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. या ऑलिंपियाडमध्ये जगभरातील बुद्धिबळपटू एकत्र येणार आहेत.

तामिळनाडूतील मामल्लापुरम भागात ही जागतिक बुद्धिबळ स्पर्धा होणार आहे. हा प्रदेश पल्लव वंशातील राजांनी बांधलेल्या शिल्प आणि स्मारकांसाठी ओळखला जातो. या ऑलिंपियाडमध्ये १८७ देशांतील ३४३ संघ सहभागी होणार आहेत. खेळाडू आणि प्रशिक्षकासह सुमारे दोन हजार ५०० लोक याठिकाणी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. भारतीय संघात २५ खेळाडू असतील. त्यांना भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद मार्गदर्शन करणार आहे.

तामिळनाडूच्या क्रीडा विकास प्राधिकरणाचे सचिव केपी कार्तिकेयन म्हणाले, “चीन या ऑलिंपियाडमध्ये सहभागी होणार नाही. याशिवाय, युक्रेनविरुद्धच्या युद्धामुळे रशियाला या स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी नाकारण्यात आलेली आहे. या दोन्ही बलाड्य देशांच्या अनुपस्थितीत भारताला सुवर्णपदक जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, या जागतिक स्पर्धेसाठी तामिळनाडू सरकारने ९२.१३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले, “चेन्नई हे बुद्धिबळाचे जन्मस्थान असल्याने अशा कार्यक्रमाचे आयोजन करणे तामिळनाडूसाठी खरोखरच अभिमानास्पद आहे.”



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply