पुण्यात महाविद्यालयाने परस्पर बारावीच्या परीक्षेचे केंद्र बदलल्याचा धक्कादायक प्रकार उघड

पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात बारावीच्या परीक्षेचे केंद्रच गायब झाल्याचे दिसून आले आहे. तुम्ही म्हणालं, हे काय आहे. तर बोर्डाचे परीक्षेसाठी संबंधित महाविद्यालयात परीक्षा केंद्र असताना, महाविद्यालयाने परस्पर केंद्र बदलले असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. टिळक रस्त्यातील एका इमारतीमध्ये राव ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स आहे. याठिकाणी बारावीचे अधिकृत परीक्षा केंद्र आहे. बोर्डाच्या संकेतस्थळावर टिळक रस्त्यावरील महाविद्यालयाच्या ठिकाणी परीक्षा केंद्र असल्याची नोंद आहे. परंतु प्रत्यक्ष परीक्षा तेथे होत नसल्याचे दिसून आले. खरंतर बोर्डाच्या परवानगीशिवाय दहावी-बारावीच्या परीक्षेचे केंद्र परस्पर बदलता येत नाही. असे असतानाही महाविद्यालयाने हे केंद्र परस्पर बदलले असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत महाविद्यालयाची बाजू जाणून घेण्यासाठी पर्यवेक्षकांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. ‘बोर्डाकडे नोंद असलेल्या परीक्षा केंद्रावर गेल्यावर विद्यार्थी तेथे परीक्षा देत नसल्याचे दिसून आले. परस्पर परीक्षा केंद्र बदल करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित संस्था चालकांवर गुन्हा दाखल करावा. गेल्या दोन वर्षापासून महाविद्यालय दिलेल्या पत्त्यावर नसताना प्रवेश होतातच कसे? शिक्षण विभागातील अधिकारी याला खतपाणी घालत आहेत,’’ - प्रशांत कनोजिया, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ‘‘राव महाविद्यालयाने परस्पर केंद्र बदलले आहे. त्यासाठी बोर्डाकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्याबाबत कोणतेही पत्र आम्हाला दिलेले नाही. याबाबत चौकशी सुरू असून पेपरच्या दिवशी प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर भेट देऊन पुढील चौकशी केली जाणार आहे. ‘स्पॉट व्हेरीफिकेशन’ होणे गरजेचे आहे. चौकशीदरम्यान विद्यार्थ्यांचा नुकसान होऊ देणार नाही. परंतु परीक्षा केंद्र परस्पर बदलल्याबाबत पालक आणि मुलांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही’’ - अनुराधा ओक, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभाग ‘‘राव कॉलेजबाबत यापूर्वीही तक्रारी आल्या आहेत. बारावीच्या पेपरदरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित नोंद असलेल्या परीक्षा केंद्राला भेट दिली. त्यावेळी तेथे परीक्षा होत नसल्याचे दिसून आले. या शाळेने बोर्डाची परवानगी न घेता परस्पर परीक्षा केंद्र बदलले असल्यामुळे त्याची शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येत आहे. त्याचा अहवाल येत्या दोन दिवसांत चौकशी अहवाल सादर होईल. या अहवालावरून बोर्ड महाविद्यालयावर कारवाई करेल,’’ - औदुंबर उकिरडे, शिक्षण उपसंचालक


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply