पुण्यात दहा वर्षांतील सर्वाधिक थंडी; नीचांकी ८.८ अंश सेल्सिअस तापमान,जिल्ह्यातही तापमान पारा १० अंशांखाली

पुणे शहर आणि परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून गारवा असला, तरी दोन दिवसांत तापमानात एकदमच मोठी घट झाली. सोमवारी (२१ नोव्हेंबर) शहर आणि परिसरात ८.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. नोव्हेंबरमध्ये २०१२ नंतर पहिल्यांदाच सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक गारवा पुणेकरांनी अनुभवला. किमान तापमानासह दिवसाच्या कमाल तापमानातही घट झाल्याने दिवसाही हलका गारवा जाणवत होता. जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा दहा अंशांखाली गेला होता. संध्याकाळनंतर गरम कपड्यांशिवाय बाहेर पडणे कठीण झाले आहे. पुढील दोन दिवसांनंतर मात्र तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

उत्तरेकडून येणाऱरे थंड वारे आणि निरभ्र आकाश, कोरड्या हवामानाच्या स्थितीमुळे संपूर्ण राज्यातच मोठ्या प्रमाणावर तापमानात घट होऊन कडाक्याची थंडी अवतरली आहे. आठवड्यापासूनच शहरातील तापमानाचा पारा घसरला आहे. गेल्या आठवड्यात ११ ते १२ अंशांवर किमान तापमानाचा पारा आल्याने रात्री गारवा जाणवत होता. मात्र, रविवारी किमान तापमानात एकदमच मोठी घट होऊन ते १० अंशांच्या खाली उतरले. रविवारी ९.७ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. सरासरीच्या तुलनेत हे तापमान ४.६ अंशांनी कमी होते. सोमवारी त्यात आणखी १ अंशांपेक्षा अधिकची घट होऊन किमान तापमान ८.८ अंशांपर्यंत खाली आले. त्यामुळे थंडीचा कडाका चांगलाच वाढला. सरासरीच्या तुलनेत हे तापमान तब्बल ५.५ अंशांनी कमी होते. गेल्या दहा वर्षातील नीचांकी तापमानासह हे तापमान यंदाच्या हंगामातीलही नीचांकी तापमान ठरले आहे.

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार २२ नोव्हेंबरला शहरात आकाश निरभ्र राहणार आहे. २३ नोव्हेंबरला मात्र काही भागात अंशत: ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. त्यामुळे दोन दिवसांनंतर रात्रीच्या किमान तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज आहे. मात्र, आठवडाभर कमी-अधिक प्रमाणात गारवा कायम राहणार आहे. दिवसाचे किमान तापमान सोमवारी २८.९ पर्यंत खाली आले होते. त्यातही पुढील तीन-चार दिवसांनंतर काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply