पुणे : सिंहगड रस्त्यावर ज्येष्ठ नागरिकाला लुटणारा मोटारचालक अटकेत; मोटारचालकाकडून सात लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : ॲपद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारचालकाने ज्येष्ठ नागरिकाला धमकावून लुटल्याची घटना घडली. मोटारचालकाने ज्येष्ठ नागरिकाला धमकावून डेबिट कार्ड चोरले. डेबिट कार्डचा सांकेतिक शब्दाचा गैरवापर करुन ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून रोकड लांबविली. लुटीच्या पैशातून त्याने महागडा मोबाइल संच, सोनसाखळी खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे. कृष्णा उत्तम सोनवणे (वय २२, रा. पार्वती हाऊसिंग सोसायटी, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या मोटारचालकाचे नाव आहे. सोनवणे याच्या बरोबर असलेल्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जेष्ठ नागरिक मूळचे मुंबईतील आहेत. ते कामानिमित्त पुण्यात आले होते. त्यांनी ॲपद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारचालकाशी संपर्क साधला होता. ज्येष्ठ नागरिकाला घेण्यासाठी मोटारचालक सोनवणे सिंहगड रस्ता परिसरात आला. ज्येष्ठ नागरिक मोटारीत बसल्यानंतर काही अंतरावर मोटारचालक सोनवणेचा साथीदार श्रीधर साहू आणि साथीदार मोटारीत बसले. त्यांनी ज्येष्ठ नागरिकाला धमकावून डेबिट कार्ड काढून घेतले. डेबिट कार्डचा सांकेतिक शब्द घेतला. डेबिट कार्डचा गैरवापर करुन सोनवणे आणि साथीदारांनी ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून रोकड काढली. सोनवणेने ८० हजारांचा महागडा मोबाइल संच, एक लाख रुपयांची सोनसाखळी खरेदी केली. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे फिर्याद नोंदविल्यानंतर पाेलिसांनी तपास सुरू केला.

मोटारचालक नवले पुलाजवळ येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस कर्मचारी अविनाश कोंडे यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून सोनवणेला पकडले. साेनवणेच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. सोनवणे याच्याकडून मोटार, महागडा मोबाइल संच, सोनसाखळी असा सात लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर, सहायक निरीक्षक सचिन निकम, संजय शिंदे, अमित बोडरे आदींनी ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply