पुणे : सहलीवरून येताना पुण्यातील दोन महिला ठार

 पुणे - तिरुपती बालाजी देवाचे दर्शन घेऊन चारचाकीतून घरी परतत असताना पुण्यातील धानोरी येथील एकाच सोसायटीत राहणाऱ्या दोन कुटुंबांचा दुर्दैवी भीषण अपघात झाला आहे. अपघातावेळी भरधाव वाहनातून बाहेर फेकल्या गेलेल्या दोन महिलांचा यात जागीच मृत्यू झाला असून त्यातील एक महिला शिक्षिका आहेत. यामुळे धानोरी परिसरात शोककळा पसरली आहे.

या अपघातात पती आणि मुले सुखरूप असून त्यांच्यावर पुण्यात रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यातील धानोरी परिसरातील दोन्ही कुटुंबे वास्तव्याला आहेत. कर्नाटक मधील दावणगिरी गावाजवळ सोमवारी रात्री आठ वाजता अपघात घडला.

मानसी सचिन शेजुळ (वय-४३) आणि उज्वला सचिन बर्वे (वय-४८, रा. अटरिया सोसायटी, मुंजाबा वस्ती, धानोरी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. सचिन बर्वे (वय-५०) हे अपघातात जखमी झाले असून, त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धानोरीतील अटरिया सोसायटीत एकाच इमारतीत शेजुळ आणि बर्वेकुटुंब वास्तव्याला असून शाळेला सुट्टी असल्यामुळे दक्षिण भारत सहलीसाठी दोन्ही कुटुंबांनी दक्षिण भारतात गेले होते.

१ नोव्हेंबर रोजी दोन्ही कुटुंबे स्कॉर्पिओ गाडी घेऊन प्रवासाला निघाले. यामध्ये शेजुळ कुटुंबातील सचिन शेजुळ, पत्नी मानसी, मुलगी श्रीमयी (वय-१३) आणि मुलगा श्रेयांश (वय-९) होते. तर बर्वे कुटुंबातील सचिन बर्वे, पत्नी उज्वला, मुलगी साक्षी (वय-२२) आणि सौरभ (वय-१९) असे सात जण होते.

बालाजीचे दर्शन घेऊन शेजुळ आणि बर्वे कुटुंब सोमवारी सायंकाळी घरी परतण्यासाठी निघाले होते. बर्वे यांचा मुलगा सौरभ हा गाडी चालवत होता. दावणगिरी गावातील रस्त्यावरून जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला.

स्कॉर्पिओ गाडीचा वेग जास्त असल्याने गाडी दोन ते तीन वेळा पलटी झाली. यादरम्यान गाडीत बसलेले मानसी शेजुळ आणि उज्वला बर्वे या दोघी बाहेर फेकल्या गेल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला.

कर्नाटकातील रुग्णालयात दोन्ही महिलांचे शवविच्छेदन करून मंगळवारी त्यांचे मृतदेह पुण्याकडे निघाले असून, मंगळवारी मध्यरात्री ते पुण्यात पोहोचतील. सचिन शेजुळ आणि सचिन बर्वे हे मूळचे नगर (केडगाव) चे असल्याने मानसी आणि उज्वला यांच्यावर गावाकडे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply