पुणे – शेतसारा, बिगरशेती कर भरा ऑनलाइन

पुणे - गावाकडे शेती आहे, तुम्ही शहरात नोकरी  करत आहात. शेतसारा कसा भरावा, असा तुमच्यापुढे प्रश्‍न आहे. बिनशेती जमिनींवर तुमची सोसायटी आहे. एनए टॅक्सची (बिनशेती कर) नोटीस आली आहे. या कराची किती थकबाकी आहे, तो कुठे भरावयाचा आहे, यांची माहिती तुम्हाला नाही. आता काळजी करू नका. कारण महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्‍सच्या धर्तीवरच ‘शेतसारा’ आणि ‘बिनशेती कर’ (एनए टॅक्स) ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय भूमि अभिलेख विभागाने आहे. त्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. पुणे जिल्ह्यासह राज्यातील पाच जिल्ह्यातील एका गावात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. लवकरच राज्यभरात ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

शेतीकर, बिनशेती कर, शिक्षण उपकर, रोजगार हमी उपकर, ग्रामपंचायत उपकर, जिल्हा परिषद उपकर आदी प्रकारचे कर देखील या सुविधेमुळे घरबसल्या भरता येणार आहे. त्यासाठी भूमि अभिलेख विभागाने एनआयसीच्या मदतीने संगणक प्रणाली विकसित केली असून पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्‍यातील एका गावात सुरू करण्यात आली आहे.

बिनशेती झालेल्या जमिनींवर उभ्या रहिलेल्या सोसायट्यांनी देखील दरवर्षी एनए टॅक्स भरावा लागतो. परंतु अनेक सोसायट्यांना त्यांची माहिती नसते. त्यामुळे थकबाकीचा रकमेचा डोंगर झाल्यानंतर आणि महसूल खात्याकडून नोटीस आल्यानंतर सोसायटीधारक जागे होतात. हा कर कुठे आणि कसा भरावयाचा, हे देखील अनेक सोसायटीधारकांना माहिती नसते. त्यातून थकबाकी वाढून जप्ती यांच्या देखील शक्यता असते. गेल्या काही वर्षांपासून त्यावरून सध्या शहरात वाद देखील सुरू आहे. दरम्यान सोसायट्यांना लागू असलेला हा कर रद्द करावा, यासाठी न्यायालयात याचिका देखील दाखल झाले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर हा कर वेळेवर वसूल व्हावा. तो भरण्यासाठीची सुविधा सुटसुटीत असावी, यासाठी ही सुविधा देखील ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply