पुणे शहरातील रुग्णालयांत नियमित उपचार पुन्हा सुरू

पुणे - शहरातील रुग्णालये पुन्हा एकदा रुग्णांनी पूर्ण भरली असून, नियोजित शस्त्रक्रियांची प्रतीक्षा यादी आता वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदले. मात्र, कोरोना अद्यापही पूर्णतः संपलेला नाही. तो सध्या फक्त कमी झाला आहे. त्यामुळे मास्क, सोशल डिस्टन्सिंग अशा कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आता कमी झाले आहे. अतिदक्षता विभागातील गेल्या आठवड्यापासून कोरोनाचा एकही रुग्ण नाही. तसेच, कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. त्याच वेळी शहरातील कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी लावलेले सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे शहर आणि परिसरातील दैनंदिन व्यवहार पूर्ववत होत आहेत. हे आशादायक चित्र आता दिसत आहे. त्याचा थेट परिणाम नियोजित शस्त्रक्रियांचे प्रमाण वेगाने वाढल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. शहरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना उद्रेक सुरू आहे. पहिली लाट ओसरल्यानंतर मधल्या काही दिवसांसाठी गेल्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नियोजित शस्त्रक्रिया सुरू झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर लगेचच दुसऱ्या लाटेतील रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली. त्यामुळे नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या. आता तिसऱ्या लाटेनंतर पुन्हा शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले. रूबी हॉल क्लिनिकचे डॉ. कपिल झिरपे म्हणाले, ‘आपण सगळे आता कोरोनाबरोबर रहायला शिकलो आहोत. कोणाला कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्या रुग्णाने चाचणी करावी. चाचणी पॉझिटिव्ह आल्यास योग्य उपचार आणि आराम करावा. ही आता नवीन जीवन पद्धती आहे. तसेच, शहरात आपले व्यवहार पूर्ववत होत आहेत. रुग्णालये हा देखिल त्यातील एक भाग आहे. रुग्णालयांमध्ये नियमित उपचार सुरू झाले आहेत.’


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply