पुणे : व्यावसायीकाला वेठीस धरणाऱ्या खासगी सावकाराला अटक

पुणे : व्याजाने घेतलेले पैसे 10 टक्के व्याजासहीत परत करुनही व्यावसायिकाकडे आणखी अडीच लाख रुपयांची मागणी करीत व्यावसायिकाची पिळवणूक करणाऱ्या खासगी सावकाराला पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखेच्या युनीट दोनच्या पथकाने हि कारवाई केली. भरत बाबूलालजी उणेचा (वय 36, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या खासगी सावकाराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बाळू पन्नालाल उणेचा (वय 38) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला व्यावसायिक कामानिमित्त पैशांची गरज होती.

त्यासाठी त्यांनी त्यांच्या ओळखीच्या भरत उणेचा याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर उणेचा याने बेकायदेशीरपणे खासगी सावकारी करीत मासिक 10 टक्के व्याजदराने फिर्यादीला पैसे दिले. त्यानुसार फिर्यादीने त्याच्याकडून दोन वर्षांपुर्वी तीन लाख रुपये 10 टक्के व्याजदराने घेतले होते. सुरक्षा ठेवेच्या स्वरुपात त्याने फिर्यादीकडून सही केलेले धनादेश, कोरे स्टॅम्प पॅड व इतर महत्वाची कागदपत्रे घेतली. तसेच त्यांच्यातील व्यवहाराबाबत कोऱ्या स्टॅम्प पेपरवर लिहूनही घेतले होते. दरम्यान, फिर्यादीने त्यास मुद्दल व व्याजाची रक्कम पुर्णपणे फेडली.

त्यानंतरही उणेचा हा फिर्यादीकडे आणखी अडीच लाख रुपयांची मागणी करु लागला. पैसे न दिल्यास समाजात तुझी बदनामी करतो, अशी धमकीही त्याने दिली. या प्रकाराला कंटाळल्याने फिर्यादीने याबाबत गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे तक्रार केली होती. चौकशीमधाये या प्रकरणामध्ये उणेचा याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, राजेंद्र पाटोळे, पोलिस कर्मचारी संजय जाधव, मोहसीन शेख, साधना ताम्हाणे यांच्या पथकाने उणेचा यास सापळा रचून अटक केली. पुढील कारवाईसाठी त्यास दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply