पुणे: राज्यात ‘राहुल गांधीं’च्या दोन जाहीर सभा; ‘भारत जोडो’ यात्रेत पुण्यातील ११५० पदाधिकारी होणार सहभागी

पुणे: काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेत पुण्यातील १ हजार १५० पदाधिकारी सहभागी होणार आहे. ही यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात संबंधित पदाधिकारी हे सहभागी होणार आहेत. राज्यात राहुल गांधी यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष कैलास कदम, यात्रेचे समन्वयक ॲड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी मंत्री रमेश बागवे उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, ‘यात्रेनिमित्ताने शहरात तीन नोव्हेंबर रोजी मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. ही यात्रा केवळ काँग्रेसची रॅली नसून एका तिरंग्याखाली काढण्यात आलेली समविचारी पक्षाची आणि नागरिकांची यात्रा आहे. यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असून व्यापक चळवळीत त्याचे रुपांतर होत आहे. महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या यात्रेचा तपशील प्रदेश काँग्रेसला मिळाला असून त्यादृष्टीने नियोजन सुरू करण्यात आले आहे. ‘यात्रेची राज्यातील सुरुवात नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून होणार आहे. संघटनात्मक ६० विभाग असून, प्रत्येकाने कोणत्या ठिकाणी यात्रेत सहभागी व्हायचे, त्याचा तपशील देण्यात आला आहे. त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकारी बुलढाण्यात यात्रेत सहभागी होतील. त्यादृष्टीने विविध स्तरावरील व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. सहयोगी राजकीय पक्षाच्या नेत्यांना यात्रेत सहभागी होण्यासाठी आमंत्रण देण्यात आले असून राज्यात केवळ पाच ते सहा जिल्ह्यांत ही यात्रा येणार आहे’ असेही चव्हाण यांनी सांगितले.

अरविंद शिंदे म्हणाले की, अठरा ते वीस नोव्हेंबर या दरम्यान पुण्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी बुलढाण्याला दाखल होणार आहेत. त्यासाठी एकूण १ हजार १५० जणांची नोंदणी झाली आहे. यातील काही कार्यकर्ते पूर्णवेळ यात्रेत चालणार आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोथरूड ते आगाखान पॅलेस या दरम्यान मोटारसायकल रॅली काढण्यात येईल. तसेच पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या ऐतिहासिक ठिकाणची माती आणि नद्यांचे पाणी एकत्रित केले जाणार असून त्याद्वारे यात्रेत वृक्षारोपण केले जाईल. दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये तीन नोव्हेंबर रोजी पदयात्रा काढली जाणार आहे. यात्रेसाठी पिंपरीतील अडीच हजार पदाधिकाऱ्यांनी नोंदणी केली आहे, असे कैलास कदम यांनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply