पुणे : रस्त्यावर येऊच नका जर असं कोणाला सांगितले तर गणेशोत्सव, नवरात्री, दहीहंडीचं काय करायचं?; राज ठाकरेंना ब्राह्मण महासंघाचा सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यास उद्या म्हणजेच तीन मेची मुदत दिली आहे. भोंगे काढले नाही तर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यावर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. भोंग्याचं प्रकरण महाराष्ट्राला काही नवीन नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते सुरू आहे. पण दुर्देवाने म्हणावं लागेल की, त्यांना देखील त्यात यश आले नाही, असं दवे यांनी म्हटलंय.

“राज ठाकरेंनी जी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे त्याबद्दल आम्ही निश्चित त्यांचं स्वागतच करतो. त्यामध्ये सातत्य राहील अशी अपेक्षा आम्ही त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे,” असंही दवे म्हणाले. तसेच पुढे बोलताना दवे यांनी, “काल राज ठाकरेंनी एका चॅनलला सपत्नीक मुलाखत दिली. त्या मुलाखती ते असे म्हणतात की, काकड आरती, हिंदूंचे होणारे सण हे नमाज आणि मुस्लिमाच्या सणाला प्रतिक्रिया आहे. पण मला असं वाटत की इस्लाम धर्म स्थापन होण्याच्या हजारो वर्ष अगोदरपासून आहे. त्यामुळेच काकड आरतीबाबत राज ठाकरे यांनी असं बोलणं चुकीचे आहे,” असं म्हटलंय.

“तसेच दुसरं त्यांनी असं ही वक्तव्य केले की जर त्यांनी नमाज प्रकरण बंद नाही झालं तर आम्ही सुधा बंद करू. याच्या सारखं चुकीच विधान नाही. आपण आपले सण उत्सव हजारो वर्षाची परंपरा बंद का करावी?,” असा सवाल देखील दवे यांनी उपस्थित केला.

“भोंगे हे केवळ मशिदी वरील काढले जातील का? नाही. भोंगे हे केवळ मशिदींवर असतातच असे नाही. सगळे भोंगे काढले जातील. हिंदूंचे प्रत्येक गावात सण, यात्रा, जयंती असतात. त्यावेळी डीजे असतात. त्यावर देखील बंदी येईल. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते. ती जयंती पाच दिवस अनेक ठिकाणी चालते. त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणावर स्पिकर लावले जातात. त्यामुळे यावर देखील बंदी येईल. यावर काय करायचं?,” असा प्रश्न असल्याचं दवे म्हणाले.

“त्यामुळे आपल्या अनेक सणांचा प्रश्न निर्माण होईल. नमाज रस्त्यावर म्हणणे हे चुकीचे आहे. ही भूमिका आज देखील हिंदू महासभेची आहे. रस्त्यावर येऊच नका जर असं कोणाला सांगितले तर गणपतीमध्ये मांडव घालून जी आरती केली जाते त्यावर देखील बंधनं येऊ शकतात, दहीहंडी, नवरात्री, दाहीहंडी यांचं काय करायच? हे प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे हा प्रश्न सोडविताना हिंदूना धूर्तपणे पुढे जावे लागणार आहे,’ असं दवे म्हणाले. तसेच ‘ओल्यासोबत सुकेदेखील जळू नये’, त्यांच्या धर्मांधतेला आपण कायद्यात अडकवू नये,अशी भूमिका असल्याचे दवे यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply